अंबाजोगाई । वार्ताहर
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा या वेळेत युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी तृतीय पुष्प गुंफताना ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले यांनी अंबाजोगाईकरांना नाविन्यपूर्ण माहीती प्रदान केली. लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन 1914 ते 1920 असा सहा वर्षांचा तप्त, रसरशीत आणि ज्वलंत कालखंड रसिक श्रोत्यांसमोर मांडून टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दिलेले अनमोल योगदान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी वाणीतून अक्षरशः उभे करून ज्येष्ठ संपादक गोखले यांनी सभागृहाला मंञमुग्ध केले.
मागील 26 वर्षांपासून विश्वास, विकास आणि विनम्रता या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणार्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या विनम्र सेवेचे रौप्य महोत्सवी वर्ष बँकेकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. दीनदयाळ बँकेतर्फे आयोजित युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प सुप्रसिद्ध व्याख्याते व ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं.गोखले यांनी टिळक पर्व विषयावर गुंफले. यावेळेस गोखले यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा परीचय सभागृहाला करून दिला. टिळक यांच्या सन 1914 ते 1920 या सहा वर्षांतील ज्वलंत कार्य कर्तृत्वावर विस्तृत प्रकाश टाकला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील टिळकांचे योगदान गोखले यांनी अधोरेखित केले. काँग्रेस, कम्युनिस्ट, बॅरिस्टर जीना ते हिंदू महासभा इथपर्यंतचे विविध संदर्भ त्यांनी दिले. टिळकांचे बाणेदार व्यक्तिमत्व, कणखर नेतृत्व, समर्पित समाजसेवक ते निर्भीड संपादक इथपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास गोखले यांनी सभागृहासमोर उलगडून दाखवला. टिळक यांनी केलेली विविध आंदोलने, वेळोवेळी घेतलेल्या कणखर भूमिका, संपूर्ण देशभरातील काँग्रेस संघटनेवरील त्यांचा प्रभाव, मंडालेचा तुरूंगवास, जहालमतवादी धोरण, स्वराज्य मिळवण्यासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न, संपूर्ण देश आणि देशाबाहेर प्रवास करून भारतीय स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी तत्कालीन सामाजिक व राजकीय धुरीणांची भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधून, चर्चा करून त्यांची सहमती मिळवण्यासाठीचे कार्य, मंडालेच्या तुरूंगात असताना गीता रहस्य ग्रंथलेखन, प्रसंगी वर्तमानपत्रातून संपादकीय लिहून तत्कालीन समाजव्यवस्थेची जनजागृती आणि इंग्रजी राज्य व्यवस्थेला वेळोवेळी दिलेले आव्हान याबाबत गोखले यांनी मौलिक संदेश दिला. मंडालेच्या तुरूंगात जाण्या आधीचे व तुरूंगवास भोगून परत आलेले लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वातील बदल गोखले यांनी सहज, सोप्या व ओघवत्या शैलीत सभागृहासमोर ठेवला. यावर्षीच्या व्याख्यानमालेतून अंबाजोगाईकरांना लोकमान्य टिळक यांच्या त्यागी, समर्पित, राष्ट्रभक्त, अभ्यासू, सक्षम आणि प्रेरक व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख ज्येष्ठ संपादक गोखले यांनी करून दिली.
समारोपीय मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख म्हणाले की, दीनदयाळ बँकेकडून सामाजिक बांधिलकीतून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला होय, ही व्याख्यानमाला आज रसिक श्रोत्यांसाठी एक पर्वणीच आहे, तर बँकेसाठी तो एक सोहळा आहे. लक्ष्मी उपासने सोबतच सरस्वतीची उपासना करण्याचे काम आम्ही एक परीवार म्हणून करीत आहोत. बँकेने नेहमीच महिला सबलीकरणास प्राधान्य दिले आहे, तसेच ग्राहकांच्या आर्थिक सुबत्तेसाठी बँकेकडून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येतात अशी माहिती उपाध्यक्ष ऍड.देशमुख यांनी यावेळेस दिली. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, बँकेचे ज्येष्ठ संचालक रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयूताई शरदराव हेबाळकर, संचालक सर्वश्री प्रा.अशोक लोमटे, इंजि.बिपीन क्षिरसागर, मकरंद सोनेसांगवीकर हे मान्यवर उपस्थित होते. तर या प्रसंगी ’भरतमुनी’ खुले सभागृहात बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी - माजी संचालक, सभासद, ठेवीदार व ग्राहक उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन करून भारतमाता तसेच जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद आणि पंडीत दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन केले. दीनदयाळ बँकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. समारोप कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेचे संचालक मकरंद सोनेसांगवीकर यांनी केले, तर बँकेचे संचालक इंजि.बिपीन क्षिरसागर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. जयेंद्र कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. तर उपस्थितांचे आभार बँकेचे कर्मचारी सुदर्शन टाक यांनी मानले.
Leave a comment