आष्टीच्या कृषी कॉलेजमध्ये आळंबी प्रकल्प सुरू
आष्टी । वार्ताहर
आष्टी येथील श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आळिंबी उत्पादन तंत्रज्ञान, रेशीम उद्योग, दूध व दुग्धजन्य पदार्थ, कृषी कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठांचे व्यावसायिक उत्पादन ,भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व व्यावसायिक कुक्कुटपालन उत्पादन प्रकल्पाचा समावेश आहे.
कार्यानुभव शिक्षण उपक्रमातून महाविद्यालयातील ओंकार तांदळे, ओम कदम, वैभव यादव, दत्तप्रभू हणमंते, वैभव गांजुरे, सचिन चीखळकर, सौरभ बोरुडे, स्वप्नील लोखंडे, ऋषिकेश गव्हाळे, सनथ कांबळे, महावीर शिंदे, दीपक पवार, सिद्धांत साबळे, बालाजी बदाले, अभिषेक होले, अपूर्व गायकवाड, रवींद्र फुलमाळी, अनिल खराडे, तेजस काकडे, कु. आकांक्षा टेके, कु. निकिता शिरसाट, कु. माधुरी राक्षे, कु. ऋतुजा लांडगे आणि कु. दिव्या वाघमोडे यांची अळिंबी उत्पादन प्रकल्प कार्यानुभवसाठी निवड झाली आहे.
प्राचार्य डॉ. श्रीराम अरसूळ यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आळिंबी पिकाची माहिती देताना प्रा. महेश साबळे म्हणाले, आळिंबी प्रक्रिया उत्पादनाला मोठा वाव असून,याचा फायदा उत्पादकांना होणार आहे. आळिंबी म्हणजे ग्रीकल्चर प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी असून या बुरशीची वाढ पूर्ण झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास आळिंबी किंवा भूछत्र असे म्हणतात. अळिंबीचे निसर्गात अनेक प्रकार असून, धिंगरीआळिंबी, शिंपला आळिंबी किंवा ओयस्टर मशरूम असे संबोधले जाते. शेतकरी जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करू शकतात. आळिंबीतील प्रथिनांमध्ये शरीरात पोषक व आवश्यक त्या सर्व अमिनो अम्लांचा सामावेश असून, ती भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा उच्चप्रतीची व वजनास हलकी असतात. आळिंबीतील विविध गुणधर्मांचा लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, फुप्फुसाचे रोग, विषाणूजन्य व जीवाणूजन्य रोग प्रतिबंधास अगर उपचारात विशेष उपयोग होतो. त्यामुळे आळिंबीस हेल्थ फूड म्हणून आहारात महत्त्वाचे स्थान आहे, असेही प्रा. महेश साबळे यांनी सांगितले. प्रकल्प चालू केल्याबद्दल प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत व प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ यांनी स्वागत केले.
Leave a comment