बीड । वार्ताहर
ऑनलाईन बँकींग करणे नागरिकांना महागात पडू लागले आहे. ऑनलाईन फ्रॉड करणार्यांसाठी महाराष्ट्रातील बीड जिल्हा मोठे सर्कल ठरु लागला आहे. पाटोदा ठाणे हद्दीत दोन नागरिकांना अशा ऑनलाईन फ्रॉडमुळे लाखोंचा फटका बसला. यात एका शिक्षकासह सैन्य दलातील व्यक्तीचा समावेश आहे. महत्वाचे हे की, सायबर पोलीसांकडून या गुन्ह्यांचा तपास केला जातो, परंतु सर्वच गुन्ह्यातील रिकव्हरी होतेच असे नाही. शिवाय खात्यातून पैसे परस्पर विड्रॉल झाल्यानंतर बँका दाद देतात ना,पोलीसांकडून तात्काळ तपास लागतो. त्यामुळे ऑनलाईन रकमा परस्पर लंपास करणार्यांचा शोध लागत नाही.
पाटोदा रामदास कैलास घुमरे (रा.पारगाव घुमरा, ता.पाटोदा) हे सैन्यदलात असून 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता ते पाटोदा येथे घरी होते, यावेळी त्यांना त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखीने कॉल करुन संपर्क साधला. ‘तुमचे नवीदिल्ली ते पुणे रद्द केलेले तिकिटाचे पैसे रिफन्ड करुन देतो’असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घुमरे यांच्या मोबाइलवर त्याने एक लिंक पाठवली. ती क्लिक करण्यास सांगत हवी ती माहिती मिळवली. नंतर घुमरे यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख 69 हजार 998 रुपयांची रक्कम काढून घेवून फसवणूक केल. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पाटोदा ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंद झाला.
दुसरा फसवणूकीचा प्रकार प्रल्हाद माधवराव खेबडे (रा.उंबरहिवरा,ता.पाटोदा हमु.शिक्षक कॉलनी,पाटोदा)यांच्या बाबतीत घडला. ते शिक्षक आहेत. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी ते घरी असताना एसबीआय क्रेडीट कार्ड या संकेतस्थळावर त्यांचे क्रेडीट कार्ड अॅक्टिव्ह करत असताना त्यांना एक लिंक प्राप्त झाली. त्यावर त्यांनी क्लिक केले असता काही क्षणात त्याच्या बँक खात्यातून 47 हजार 889 रुपये परस्पर दुसर्या खात्यात वळवले गेले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर प्रल्हाद खेबडे यांनी बँक स्टेटमेंट काढले तेव्हा ती रक्कम पेटीएम एज्युकेशन नोएडा इन यावर विड्रॉल झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी पाटोदा ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार नोंदवली. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आता सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
Leave a comment