मुंबई | वार्ताहर
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. तब्बल पाच टर्म विधानपरिषद सदस्य म्हणून कारकीर्द गाजवणारे मेटे यांच्या अपघाती निधनामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनीसांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.
Leave a comment