बीड | वार्ताहर
राज्यातील तब्बल 8 हजार 596 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अखेर प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज दि.2 मे रोजी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील 1 हजार 849 ग्रामपंचायत तसेच डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यातील सुमारे 6 हजार 747 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. अशा सर्व 8 हजार 596 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींची प्रभाग रचना करण्याच्या कार्यवाहीस तात्काळ सुरूवात करण्यात आली असून त्यानुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
शासनाचे उपसचिव मनोज जाधव यांच्या स्वाक्षरीने राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना ग्रा.पं.निवडणुका योग्य प्रकारे पार पाडण्या संबंधीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. आदेशात म्हटले आहे की, ग्रा.पं.च्या सर्व निवडणुका, निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची आहे. त्यांनी राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाप्रमाणे या निवडणुका योग्य प्रकार पार पाडाव्यात. तसेच ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना व आरक्षण कार्यपध्दती 24 नोव्हेंबर 2021 च्या आदेशात नमुद केली आहे. त्यानुसार प्रभाग रचना करतांना सर्व मार्गदर्शक तत्वे विचारात घ्यावीत. दि.9 मे ते 5 जुलै 2022 या कालावधीपर्यंत सर्व ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रभाग रचना कार्यक्रम राज्य शासनाने विस्तारीत जाहीर केला आहे.
Leave a comment