बीड । वार्ताहर
बीड विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेने अंबाजोगाई दौर्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जनता विकास परिषदेच्या बीड जिल्हा पदाधिकार्यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर रविवारी दि.24 एप्रिल रोजी पुन्हा एकदा जनता विकास परिषदेच्या सर्व पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित दादांची पुणे येथे भेट घेवून बीड विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. यावर अजितदादा पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात विमानतळ नाही त्या जिल्ह्यांमध्ये विमानतळ उभारण्याचा आघाडी सरकारचा निर्णय झालेला आहे. यात बीड विमानतळाचा प्रश्न प्रथम प्राधान्याने मार्गी लावला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठवाडा जनता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगवान यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची जनता विकास परिषदेच्या पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेट घेवून बीड विमानतळा संदर्भात त्यांना निवेदन दिले. बीड येथे तातडीने विमानतळ उभारणीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी. आघाडी सरकारने यासाठी आग्रहाची भुमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विमानतळाच्या सुविधेमुळे निर्माण होणारा रोजगार आणि व्यापार, औद्योगिक विकासासाठी मिळणारी चालना याबाबत मंत्री महोदयांशी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले, महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात विमानतळ नाही त्या जिल्ह्यांमध्ये विमानतळ उभारण्याचा आघाडी सरकारचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे बीड विमानतळाचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी मराठवाडा जनता विकास परिषदेचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य तथा लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती, संकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया, पत्रकार अतुल कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनावर राजेंद्र आगवान, दिलीप खिस्ती, नरेंद्र कांकरिया, सर्वोत्तम गावरस्कर, पत्रकार सुशील देशमुख, अविनाश वाघीरकर, दिनेश लिंबेकर, डी.के.देशमुख, सुमंत गायकवाड, नरेंद्र काळे, डॉ.डी.एच.थोरात, शिरीष देशमुख, संतराम कराड यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment