कडा येथील डॉ.आंबेडकर चौकात भीषण अपघात
आष्टी । वार्ताहर
जामखेड-नगर राष्ट्रीय महामार्गावर आष्टी तालुक्यातील कडा येथील आंबेडकर चौकाजवळ टेम्पोने समोरुन येणार्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात टेम्पोच्या मागील चाकाखाली आल्याने महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला. भीषण अपघाताची ही घटना दि.24 एप्रिल रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
लता रावसाहेब काळे ( रा.वडगाव दक्षिण ता.करमाळा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती रावसाहेब काळे हे गंभीर जखमी झाले आहेत.करमाळा तालुक्यातील वडगाव दक्षिण येथील रावसाहेब काळे हे पत्नीसह आष्टी तालुक्यातील शेरी येथे आजारी असणार्या नातेवाईकांला भेटायला आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास कड्यावरून गावाकडे जात असताना अहमदनगर येथील भुसा वाहतूक करणारा टेम्पो क्र.(एम.एच.10 झेड 3157) भुसा उतरवून आष्टीहून नगर कडे जात होता.
कडा येथील आंबेडकर चौकाजवळ या टेम्पोने समोरून येणार्या दुचाकीला क्र. (एम.एच.45 एआर 3830) जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लता काळे या टेंपोच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रावसाहेब काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, पो.कॉ.मंगेश दुधाळ ,पोपट घोडके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात मदत केली.दरम्यान अपघात झाल्यानंतर टेम्पो चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी एक किलोमीटर अंतरावर पाठलाग करून टेम्पो पकडून पोलीस चौकी येथे आणला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक माणिक भोजने याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Leave a comment