बीड । वार्ताहर
एसटीच्या सर्व कर्मचार्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यामुळे राज्यभरात सर्वच विभागातील आगारनिहाय कर्मचारी मूळ नियुक्तीवर हजर होवू लागल्याचे आशादायी चित्र पहावयास मिळाले. बीड जिल्ह्यात 8 ते 22 एप्रिल 2022 या 15 दिवसांत एसटीचे तब्बल 1 हजार 240 कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे आता सद्यस्थितीत प्रत्यक्ष हजर कर्मचार्यांची संख्या 2 हजार 135 इतकी झाली आहे. तर आता केवळ 8 कर्मचारी संपात असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना दिली.
एसटीचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचार्यांनी 28 ऑक्टोबर 2021 पासून संप सुरू केला होता, एसटी संपात कर्मचार्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील अॅड. गुणवर्त सदावर्ते यांना झालेली अटक तसेच या आंदोलनप्रकरणी न्यायालयाने सर्व कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे दिलेले आदेश याचा परिणाम म्हणून बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी दिवसभरात 44 चालक, 65 वाहकांसह यांत्रिक विभागातील 7 व प्रशासकीय विभागातील 10 असे एकूण 126 कर्मचारी कामावर हजर झाले. तसेच 8 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात 528 चालक, 553 वाहक, यांत्रिक विभागातील 143 कर्मचारी तसेच प्रशासकीय विभागातील 16 असे एकूण 1 हजार 240 कर्मचारी कामावर रुज झाले आहेत. बीड जिल्ह्यात एसटीचे एकूण 8 आगार आहेत. यात बीड, परळी, धारुर, माजलगाव, गेवराई, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई आगाराचा समावेश आहे. या सर्व आगारात प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी यांच्यासह चालक आणि वाहक असे एकूण 2 हजार 702 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी सध्या 2 हजार 135 कर्मचारी प्रत्यक्ष हजर झाले आहेत तर 5 कर्मचारी गैरहजर असून 554 कर्मचारी साप्ताहिक सुट्टी, दौरा आणि अधिकृत रजेवर आहेत.
शुक्रवारी 1130 बसफेर्या; 44 लाखांचे उत्पन्न
बीड विभागातंर्गतच्या आठही आगारातील बसफेर्या कर्मचारी कामावर परतू लागल्याने पूर्ववत सुरु होवू लागल्या आहेत. 22 एप्रिल रोजी सायं 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात शिवशाही, हिरकणी व साध्या बस अशा एकूण 1130 फेर्या विविध मार्गावर झाल्या. यादरम्यान 58हजार 963 प्रवाशांनी प्रवास केला. शुक्रवारी दिवसभरात या सर्व बसफेर्यातून बीड एसटी विभागाला सरासरी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.
Leave a comment