कोंबडीचे खाद्य घेऊन जाणारा धावता ट्रक पेटला
बीड | वार्ताहर
कोंबडीचे खाद्य देऊन सोलापूरकडे निघालेल्या मालवाहू ट्रकने पेट घेतला. काही क्षणार्धात संपूर्ण ट्रकला आगीने कवेत घेतले आणि हा ट्रक जळून खाक झाला. 20 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते चौसाळा रस्त्यावरील मोरगाव फाट्यावर ही दुर्घटना घडली.
बुधवारी दुपारी बीडमार्गे मालवाहू ट्रक (क्र.ए पी. 39 टी 5786) हा कोंबडीचे खाद्य घेऊन सोलापूरकडे जात होता. धुळे-सोलापूर महामार्गावरील मोरगाव फाट्यानजीक या ट्रकच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि क्षणार्धात इंजिनने पेट घेतला. चालकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून महामार्गालगत ट्रक उभा केला. परंतु लागलेली आग विझविण्यासाठी पाणी नसल्याने ट्रक चालकाला उभा ट्रक जळताना पहावा लागला. ट्रकला आग लागल्यानंतर धुराचे लोट परिसरातील दोन कि.मी.अंतरापर्यंत पसरले होते.
यादरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. ट्रकने पेट घेतल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक घोडके व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती देत पाचारण करून घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मालवाहू ट्रक जळून खाक झाला आहे, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रखरखत्या उन्हामुळे तापमानात झालेली प्रचंड वाढ यामुळे धावत्या ट्रकने पेट घेतल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
Leave a comment