बीड | वार्ताहर
येथील जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक दोनमध्ये बंदीवान असलेल्या एकास दोघा जणांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. 19 एप्रिल रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमारास हा प्रकार घडला. बंदीवानाला झालेल्या मारहाणीने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणी कारागृह अधिकारी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.
जमीर रऊफ शेख (रा.लऊळ नं.1, ता.माजलगाव) असे मारहाण झालेल्या बंदीवानाचे नाव आहे. तो सध्या जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक 2 मध्ये बंदीस्त आहे. 19 एप्रिल रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास सय्यद शाहरूख सय्यद नूर व सय्यद नासेर सय्यद नूर या दोघांनी त्यास लाथाबुक्क्याने पाठ, पोट, हातावर मारहाण केली. नंतर प्लॅस्टीकची बकेट तोंडावर व मानेवर मारून दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कारागृह अधिकारी विजयकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक सानप पुढील तपास करत आहेत.
Leave a comment