पुणे । वार्ताहर

राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्च तर 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहेत.मंडळाकडून शनिवारी, सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला आज सरकारने (Maharashtra government) संमती दिली असून त्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या नियोजनात ऐनवेळी बदल केल्यास सर्व गणिते बिघडणार असल्याने या परीक्षा मंडळाकडून जाहीर केलेल्या नियोजित वेळेतच घेतल्या जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार असून दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखन वेग कमी झाला आहे. हे लक्षात घेता परीक्षेसाठी अर्धात तास जादा वेळ देण्यात आला आहे. राज्यात बारावी परीक्षांसाठी १४,७२,५६४ तर दहावीच्या परीक्षांसाठी १६,२५,३११ आवेदन पत्र प्राप्त झाली आहेत. अशी माहितीमहाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत. ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत. ५ एप्रिल ते २२ एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत. १२वी साठी एकूण १५८ विषयांसाठी ३५६ प्रश्नपत्रिका आणि १० वीच्या ६० विषयांसाठी १५८ प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. 

शिक्षण मंडळाने ऑफलाईन परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी पावणे दोन लाख कर्मचारी झटत आहेत. कोरोनाचा विचार करून आवश्यक काळजी घेतली जात असून झिग झॅक पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल. त्यांना चांगले वातावरण मिळेल, असे शरद गोसावी यांनी सांगितले.

सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होणार आहे. तर, मुलांना १०.२० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. तर, दुपारच्या सत्राची परीक्षा २.३० वाजता सुरु होईल आणि मुलांना प्रश्नपत्रिका २.२० वाजता देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने अर्धा तासाचा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 

बारावीची परीक्षा कधी?

 

बारावीची लेखी परिक्षा 4 मार्च ते  30 मार्च दरम्यान ऑफलाईन होणार आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत दरम्यान घेण्यात येईल. कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा लेखी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. 

दहावीची परीक्षा कधी?

 

दहावीची प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान होणार आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे उशीरा घेण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.

विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ

 

यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.

परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. यावेळेस प्रॅक्टिकल परीक्षेसाठी शाळेबाहेरचे शिक्षक बहिस्थ परीक्षक म्हणून नसतील तर, त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परीक्षक म्हणून काम करतील. मुख्य परिक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे. 

परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला तर, त्या विद्यार्थ्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही. परिक्षेनंतर 40 ते 45 दिवसांमधे निकाल लावण्यात येणार असल्याचंही शिक्षण विभागाने सांगितलं आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.