गेल्या दीड-पावणे दोन वर्षांच्या कालखंडाने प्रत्येकाला व्यक्तिगत अवकाशापासून जागतिक अवकाशापर्यंत अशा काही आंदोलनांमध्ये फिरवलं आहे की आता प्रत्येकाच्या जाणिवा, समज, धारणा अधिक टोकदार झाल्या आहेत. गेले अनेक महिने घराच्या उंबरठ्यात खिळलेल्या लोकांच्या मनातल्या सीमोल्लंघनाच्या व्याख्येलाही नवे आयाम जोडले गेले आहेत. म्हणूनच साजर्‍या होणार्‍या दसर्‍याचे संदर्भ बहुआयामी आणि बहुपेडी नसतील तरच नवल.

प्रदीर्घ काळानंतर काहीशा सैलावलेल्या आणि तणावरहीत मनोवस्थेत साजरी होत असणारी यंदाची विजयादशमी विजयाचा नवा अर्थ पटवून देणारी आहेच, त्याचबरोबर ज्याच्यावर विजय मिळवायचा त्या शत्रूचं आणि शस्त्रांचं बदलतं स्वरुपही दाखवून देणारी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शस्त्रपूजन, दैवतांचं स्तवन, सणांचा उल्हास आणि सायंकाळी होणारं रावणप्रतिमेचं दहन हे कर्यक्रम पार पडतील. पण हे सगळं करतानाची मानसिकता यंदा अनेक अर्थांनी वेगळी आहे, याबाबत शंका नाही. खरं तर गेल्या दीड-पावणे दोन वर्षांच्या कालखंडाने प्रत्येकाला व्यक्तिगत अवकाशापासून जागतिक अवकाशापर्यंत अशा काही आंदोलनांमध्ये फिरवलं आहे की आता प्रत्येकाच्या जाणिवा, समज, धारणा अधिक टोकदार झाल्या आहेत. मनामनात युध्दाची नवी परिभाषा तयार झाली आहे. आता प्रत्येकाच्या मनात विजयाचा नवा अर्थ जागृत झाला आहे. गेले अनेक महिने घराच्या उंबरठ्यात खिळलेल्या लोकांच्या मनातल्या सीमोल्लंघनाच्या व्याख्येलाही नवे आयाम जोडले गेले आहेत. म्हणूनच एकिकडे भयव्याकुळता कमी होत असताना तर दुसरीकडे जागतिक पातळीवर सत्ताधिशांचे चेहरेमोहरे आणि त्या अनुषंगाने वैश्विक राजकारणाचा चेहरामोहरा बदलत असताना साजर्‍या होणार्‍या दसर्‍याचे संदर्भ बहुआयामी आणि बहुपेडी नसतील तरच नवल.

धार्मिकतेबरोबरच महत्वाचं अंग असणारं शस्त्रपूजन ही दसर्‍याची प्रमुख ओळख आहे. नुक्कतीच जम्मू-काश्मिरमध्ये झालेली चकमक चर्चेच्या फेर्‍या निष्फळ ठरल्यानंतर चीनकडून सीमेलगतच्या भागामध्ये नव्याने केली गेलेली दंडेली, अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या तालिबानी अत्याचाराची घेतली जाणारी दखल आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचे प्रश्न मार्गी लागत असताना या सर्व जागतिक परिस्थितीचा अंदाज घेत सुरु असणारी देशाची शस्त्रसज्जता हे सगळेच विषय दसर्‍याच्या निमित्ताने ठळकपणे समोर येणारे आहेत. सध्या युध्दाचं स्वरुप बदलत आहे. योद्ध्यांच्या बदलत्या वार-पलटवाराचं नवं तंत्र प्रत्ययाला येत आहे. बदलत्या जागतिक समिकरणामुळे मित्र आणि शत्रू ओळखण्यासाठी जास्त ताकद पणाला लावावी लागत आहे. या सगळ्याचं भान राज्यकर्त्यांना आहे, तसंच ते सर्वसामान्य जनतेलाही आहे. म्हणूनच या विस्तारलेल्या जाणिवांनिशी आपल्या माणसांच्या गमावलेल्या अतीव दु:खानिशी, राखेतून भरारी घेण्याच्या जिद्दीनिशी सामोरं जात साजरा होणारा हा उत्सव अनोखा म्हणायला हवा. 
शस्त्रसज्जता, शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन ही क्षात्रिय कर्मं दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर पार पडायची आणि साम्राज्यविस्तार करुन पुरुषार्थ गाजवणार्‍या नरवीरांच्या पराक्रमांचे पोवाडे गाण्याच्या पराक्रमांचा पाठ राज्य आणि संस्थानकाळ अनुभवणार्‍या राजेरजवाड्यांपर्यंत ऐकायला मिळतो. पण देश एकसंध झाला, रयत आणि राजा हा भेद संपला, देशाची सार्वभौम लष्करशक्ती निर्माण झाली, समस्त देशातलं क्षात्रतेज तिथे एकवटलं, पारंपरिक शस्त्रं कालबाह्य होऊन युद्धाच्या प्रगत पद्धतीनुरुप नव्याने शस्त्रसज्जता साधली आणि एका नव्या पर्वाला सुरूवात झाली. दसर्‍याचा संदर्भ घेऊन या शस्त्रसज्जतेकडे बघायचं झाल्यास या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे सहज लक्षात येईल.
शस्त्रधारींचं धाडस, मनोनिश्चय, शारीरिक आणि मानसिक शक्ती, साहस यामुळे युद्ध जिंकता येतं. आपल्याकडे ते आहेच त्याचबरोबर देशातल्या क्षात्रतेजाला अस्सल देशप्रेमाचं कोंदणही आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार अशा आजूबाजूंच्या देशांकडे पाहिलं असता अनेक देशांमध्ये लष्करी हस्तक्षेपाने सत्ता परिवर्तन घडलेलं दिसतं. या देशांमध्ये वेळोवेळी सैन्याने क्रांती केलेली दिसते. भारतात मात्र ही बाब पहायला मिळत नाही कारण भारताची संरक्षण व्यवस्था सक्षम आहे. ही ढाल मजबूत असल्यामुळेच स्वातंत्र्यानंतर आक्रमणं झाली तरी भारत अभंग राहिला. दुसरीकडे, संरक्षणशक्तीला भारतीय भक्तीचंही भान आहे. देशभक्तीने भारलेलं असं अंत:करण असल्यामुळेच भारतीय सैन्याने कधी क्रांती केली नाही. सैन्यशक्ती प्रबळ झाली तर देशामध्ये सत्ता परिवर्तनाची भीती असते पण आपल्याकडे असं होऊ शकत नाही. कारण आपल्या सैनिकांच्या मनामध्ये भारतीयत्व भिनलं आहे. संस्कृतीकडून मिळालेलं हे एक संचित आहे. 
आपण शस्त्रसज्ज आहोतच; त्याचबरोबर शत्रूला सीमापार येऊ न देण्याचं सामर्थ्यही आपल्यामध्ये आहे. 1962 चं युद्ध सोडलं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत 1965, 1971 ही युध्दं तसंच कारगिल युद्धामध्ये, ईशान्य भारतामध्ये किंवा अलिकडच्या गलवान संघर्षामध्ये बंदुकीच्या बळावर कोणीही भारताचा इंचभर भूभागही बळकावलेला नाही, हे देखील भारताचं उल्लेखनीय यश म्हणावं लागेल. यामुळेच बंदुकीच्या बळावर कोणी भारताची भूमी हडप करु शकणार नाही, हा संदेश जगापर्यंत पोहोचला आहे. कोणी असा प्रयत्न केला तरी भारतीय जनमानस हे होऊ देणार नाही. यासाठी त्याग करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती भारतीयांमध्ये आहे. आज ईशान्य भारतामध्ये छुपं युद्ध सुरु आहे. तिथे भारतापासून वेगळं होण्याची मागणी होत आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम असे भूभाग ही मागणी लावून धरत आहेत पण त्या क्षेत्रात अद्याप एकही इंच जमीन बाहेर गेेलेली नाही. याचा अर्थ भारतीय जनमानस विभाजनाला संमती देणार नाही. या जनमानसाचा संपूर्ण पाठिंबा सैन्यशक्तीच्या पाठीशी एकवटला आहे. म्हणूनच आपण जिंकत आहोत. हीच बाब काश्मीरमध्ये लागू होते. पाकिस्तानने 1947 पासून आपल्या देशात अस्थिरता माजवण्याचे अनेक प्रयत्न केले. देशात दहशतवाद पसरवला पण भारतीय संरक्षण व्यवस्थेने काश्मीरची एक इंच जमीनही बाहेर जाऊ दिली नाही. सीमारक्षणाचं हे महत्त्वही खूप मोठं आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.