गेवराई तालुक्यातील रांजणीजवळील घटना
गेवराई | वार्ताहर
तालुक्यातील रांजणी गावाजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. शनिवारी (दि.२) रात्री उशिरा धुळे-सोलापूर महामार्गावरील रांजणी जवळील सर्विस रोडच्या एका नाल्यात ही घटना उघडकीस आली.माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील महिलेचा खून करुन रांजणीजवळील निर्मनुष्य ठिकाणी हा मृतदेह आणून टाकला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावरील गेवराई हद्दीतील रांजणी येथील ग्रामस्थांना परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्यांनी पाहणी केली असता शनिवारी रात्री गावालगत सर्विस रोडच्या एका नाल्यात मयत महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर याची माहिती गेवराई पोलिसांना दिल्यानंतर गेवराईचे सहाय्यक उपनिरीक्षक शेळके, पो.कॉ. खटाणे यांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.
दरम्यान गेवराई पोलिसांनी याबाबत विस्ताराने माहिती घेतली असता जालना येथून एक महिला आठ दिवसांपूर्वी बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित नातेवाईकांना याबाबत माहिती देऊन ओळख पटवली असता ती आमची महिला नसल्याचे सांगितले.त्यामुळे हा सापडलेला मृतदेह कोणाचा आहे ? हा खून की अन्य काही प्रकार आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल असे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी सांगितले.
Leave a comment