पाच लाख 24 हजार हेक्टर क्षेत्र बााधित;67 कि.मी.चे रस्तेही फुटले
बीड । वार्ताहर
अतिवृष्टीचा मोठा फटका बीड जिल्ह्याला बसला असून लाखो हेक्टरवरील शेतपीके नष्ट झाली आहेत. पंचनामे करण्याचे काम सुरु असून आता 23 सप्टेंबर ते त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचे नव्याने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अतिवृष्टीचा फटका बसल्याने जिल्ह्यातील तब्बल 57 लहान-मोठे पुल वाहून गेले आहेत. तर या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील तब्बल 6 लाख 65 हजार 910 शेतकर्यांचे 5 लाख 24 हजार 212 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची पुरती वाताहत झाली असून खरीप हंगाम पाण्याखाली गेला आहे.प्रशासनाकडून आता या नुकसानीपोटी लागणारा अपेक्षित निधीची गोळाबेरीज करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
जिल्हा महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत तर दुसरीकडे जिल्ह्यात शेत पिक नुकसानीबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच 116 दुधाळ आणि 175 लहान जनावरे वाहून गेल्याने मयत झाली आहेत. याशिवाय ओढकाम करणार्या 85 मोठ्या व 52 लहान जनावरांचाही अंत झाला. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत 20 व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच 9 घरांची पुर्णत: पडझड झाली तर 1 हजार 942 घरांची अशंत पडझड झाली,
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने 298 झोपड्या जमिनदोस्त झाल्या, तसेच 10 जनावरांचे गोठेही वाहून गेले. सध्या जिल्ह्यात 20 गावे पूर रेषेत असून आपेगाव व मौजे देवळा (ता.अंबाजोगाई) ही दोन गावे नदीकाठी असून या ठिकाणी देवळा येथे पाण्यात अडकलेल्या 58 व आपेगावात 19 अशा 77 नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले. प्रशासन पूर सदृश्य स्थितीवर लक्ष ठेवून असून स्थंलातरित झालेल्या लोकांची व्यवस्था नजिकच्या शाळेत केली गेली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.
Leave a comment