बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गोदावरी, मांजरा, सिंदफना आदी नद्यांच्या क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीने बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती ओढवली आहे. जिल्हा प्रशासन, एन डी आर एफ आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असून पुरात अडकलेल्या लोकांना मदतकार्य करत आहेत. जिल्ह्यात मनुष्य हानी, पशुहानी यासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना-शेतकऱ्यांना धीर देणे, त्यांना मदत करणे गरजेचे आहे, या दृष्टीने जलसंपदा व महसूल प्रशासनाकडून आवश्यक माहिती घेऊन मदत देण्यासंबंधीची कार्यवाही करण्यात येईल; अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. बीड जिल्हा दौऱ्यानिमित्त परळीत आले असता जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात खूप मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री बीड जिल्ह्यातील विविध नद्यांना व विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, रस्ते-पूल तुटले, वाहून गेले अशा अनेक बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला असून पुराच्या ठिकाणी रात्रीत लोक अडकले होते. एन डी आर एफ व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. बऱ्याच प्रमाणात पशु हानी देखील झाल्याचे वृत्त आहे; याबाबत जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अधिकृत आकडेवारी मिळेलच, असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
सततच्या पावसाने बाधित क्षेत्राची आकडेवारी बदलत आहे, त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पंचनामे अंतिम करून नुकसान झालेल्या शेतीला सरसकट मदत देण्यासंबंधीची प्रक्रिया राबविली जाईल. पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत वॉर रूम सुरू करण्याचेही निर्देश दिले आहेत; असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान रात्रीतून जिल्ह्यातील विविध तलावांचे दरवाजने उघडले, अनेक नद्यांना पूर येत आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर असताना त्यातून वाहने घालण्याचे किंवा चालत जाण्याचे धाडस करणे टाळावे, पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावांनी नजीकच्या शासकीय यंत्रणांना याबाबत माहिती द्यावी. वाहत्या नद्या, जलाशय, धोकादायक बांधकामे अशा ठिकाणी पूर्णपणे टाळावे असे आवाहनही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
Leave a comment