पिकांचे अतोनात नुकसान ;शेतकरी कोलमडला
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात 23 सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार (दि.27) पासून तर पावसाने बीड जिल्ह्यात उच्चांकी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे विशेषतः केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील शेकडो गावांची वाताहत झाली आहे. नदी, ओढे ओसंडून वाहत असून विविध पूल पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून ग्रामस्थांनी कालची रात्र भीतीपोटी अक्षरशः जागून काढली. गत 24 तासात जिल्ह्यातील 30 महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अंबाजोगाई आणि केज तालुक्यात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. युसूफ वडगाव, महसुल मंडळात काही तासात तब्बल 211 मि.मि. पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात 28 महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात बीड 70.3 मि.मि., नाळवंडी 77.3, पेंडगाव 86, गेवराई 113.3, जातेगाव 77.8, पाचेगाव 109, सिरसदेवी 68.5, रेवकी 141.3, तलवाडा 128, अंबाजोगाई 110.8, पाटोदा ममदापुर 190.8, लोखंडी सावरगाव 118.3, घाटनांदुर 75.5, बर्दापूर 92, केज 102.5, युसूफ वडगाव 211.3, हनुमंत पिंपरी 90.3, होळ 208.3, विडा 94.8, बनसारोळा 115.5, परळी 68, धर्मापुरी 67.3, नागापूर 74, सिरसाळा 67, पिंपळगाव 65.8, धारुर 108.3, मोहखेड 132.8 व तेलगाव महसुल मंडळात तब्बल 135.3 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.
केज तालुक्यात उंदरी नदीचे पाणी नायगावमध्ये घुसले असून तट बोरगाव शिवार पूर्ण पाण्यात गेले आहे तर सोनिजवळा पाझर तलावाचे पाणी अनेक घरात घुसले. इस्थळ जि.प. शाळेतही पाणी आले आहे. होळणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सोमनाथ बोरगावचाही संपर्क तुटला आहे. शेकडो गावातील शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची गिणतीच राहिली नसून सध्या फक्त स्वतःचा, कुटुंबियांचा आणि जनावरांचा बचाव करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.
दरम्यान, केज, कळंब, भूम, वाशी, चौसाळा, नेकनूर, भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोमवारी रात्री धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने म्हणजेच तीन मीटर पर्यंत उचलण्यात आले होते. मात्र, तरीही येवा सुरूच असल्याने आज मंगळवारी पहाटे धरणाचे आणखी 12 दरवाजे उघडण्यात आले. सद्य स्थितीत धरणाचे सर्वच्या सर्व एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यापैकी सहा दरवाजे तीन मीटरने तर 12 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 70 हजार 846 क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणीच विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना महापुराचा प्रचंड धोका निर्माण झाला असून नागरिकांनी अतिसतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सोमवारी रात्रीच्या मुसळधार पावसाने भोईगल्ली, मोची गल्ली व पंचशील नगर भागातील अनेक घरामध्ये पाणी शिरले. भीतीपोटी या भागातील नागरिकांना रात्र जगून काढावी लागली.
मांजरा धरणाचे सर्व 18 दरवाजे उघडले
अतिवृष्टीमुळे केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही. अखंडित पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने मंगळवारी पहाटे धरणाचे सर्वच्या सर्व 18 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहदरम्यान, सोमवारी रात्रीच्या पावसात केज मधील डॉ. थोरात यांच्या रुग्णालयासमोरील तात्पुरता बांधलेला कच्चा पूल वाहून गेला. त्यामुळे केज-अंबाजोगाई रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. या भागातील अनेक दुकाने आणि घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तर, कळंब-अंबाजोगाई रस्त्यावर सावळेश्वर पैठण येथील पुलावरून पाणी आल्याने हा रास्त देखील बंद झाला आहे.
सिंधफणा, गोदावरी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक वाढलेली असल्यामुळे, प्रकल्पातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. सांडव्यातून 80 हजार 534 क्यूसेक विसर्ग सिंदफना नदीपात्रात सुरु आहे. पाउस व त्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक, यानुसार विसर्गामध्ये वाढ करण्यात येवू शकते. सध्या माजलगाव धरण व पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, ’धरणात येणारे सर्व पाणी सिंदफना नदीपात्रात सोडावे लागणार असल्यामुळे सिंदफना व गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अंबाजोगाई, केज तालुक्यात एनडीआरएफ तैनात
जिल्ह्यात गत 24 तासात बीडसह गेवराई, अंबाजोगाई, केज, धारुर व परळी या तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. केज आणि अंबाजोगाईतील नुकसान प्रचंड आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत, बंधारे फुटले आहेत. पुले वाहून गेली आहेत. धरणे खचाखच भरली आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहेत. ग्रामस्थांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ बोटसहित तैनात करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने जिल्हा जलमय झाला आहे. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीपासूनच मांजरा धरणाचे सहा दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडत असताना वीज पुरवठा खंडीत झाला. धरणस्थळी मोठा आवाजही झाला. जनरेटरच्या मदतीने दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झाला. रात्री एक वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तब्बल 18 दरवाजे उघडण्यात आले. 70 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. माजलगाव प्रकल्पातूनही मोठा विसर्ग सुरू आहे. अंबाजोगाई, केज आणि परळी तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा गावात शिरले आहे. आपेगावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोटसहित दाखल झाले आहेत. लातूरहूनही जादा कुमक मागवण्यात आले आहे. देवळा गावाला पाण्याने वेढा दिला आहे. परळी तालुक्यातही काही गावांना वेढा दिला आहे.
केज तालुक्यामध्ये बंधारे फुटले आहेत, शेती वाहून गेली आहे, भाटुंबा, कुंबेफळ, पिसाटी, मांजरसुंबा, अंबाजोगाई रस्ते बंद करण्यात आले आहेत. अंबाजोगाई-कळंब रस्ताही बंद करण्यात आला. सावळेश्वराचा पुल पाण्याखाली आहे. बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात परिस्थिती भयंकर झाली आहे. आपेगाव येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सध्या बोटीचा उपयोग केला जात असला तरी हेलिकॉप्टरलाही पाचारण केले जाणार असल्याची शक्यता आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी तशा सूचना दिल्या आहेत.
Leave a comment