4 लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झाले पुर्ण
बीड । सुशील देशमुख
जिल्ह्यात 30 व 31 ऑगस्ट व नंतर 4 ते 7 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर शेकडो हेक्टर शेतजमिन पीकांसह वाहून गेली आहे. काढणीला आलेली खरीपाची सर्वच पीके जमिनदोस्त झाली. शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर ही प्रक्रियाही 8 सप्टेंबरपासून सुरु झाली. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, त्यामुळे सर्व पीक पंचनामे व्यवस्थित व्हावेत यासाठी स्वत: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा शेत बांधावर पोहोचले, नुकसानीची पाहणी करत व्यवस्थित पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. त्याचाच परिपाक म्हणून आता 22 सप्टेंबरपर्यंत महसूल यंत्रणेने पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला सोबत घेवून पंचनामे केले. यात जिल्ह्यातील बाधित असलेल्या 5 लाख हेक्टर क्षेत्रापैकी आता 4 लाख हेक्टरवरील पीक पंचनामे पुर्ण झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात यंदाचा खरीप हंगामच वाया गेला आहे. लाखो हेक्टरवरील पीके पाण्याखाली गेल्याने बळीराजा हतबल झाला.या सार्या स्थितीत एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा यंत्रणेला दिले होते, त्यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी सोबत घेवून पंचनामे करण्याची प्रक्रिया 8 सप्टेंबरपासून सुरु झाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 7 लाख 37 हजार 225 शेतकर्यांचे तब्बल 5 लाख 19 हजार 425 हेक्टर क्षेत्रावरील पीके जमिनदोस्त झाली. अनेक ठिकाणी शेतजमिन वाहून गेली. अनेक ठिकाणी फळबांगाचे नुकसान झाले. बाधित पिकांच्या पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले असून आता 22 सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात 5 लाख 96 हजार 159 शेतकर्यांच्या 3 लाख 98 हजार 713 क्षेत्रावरील पीकांच्या पंचनाम्याची प्रक्रिया महसूल यंत्रणेकडून पुर्ण करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांनी घेतली सकारात्मक भूमिका
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्वच पीके धोक्यात आली. अशावेळी शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पुर्ण व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्वत: बीड, गेवराई तालुक्यात अनेक ठिकाणी जावून नुकसानीची पाहणी करत झालेले नुकसान जाणून घेतले होते. शिवाय योग्य पध्दतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही तलाठी,मंडळाधिकार्यांना दिले होते. जिल्हाधिकार्यांची ही संवेदनशील भूमिका निर्णायक ठरली असून पंचनामेही वेगाने पुर्ण होत आहेत. आता वेळेवर शेतकर्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पडझड आली अन् पशूधनासाठीही पैसे
जिल्ह्यात जुलै 2021 मध्ये उद्भवलेल्या पुर स्थितीत पाच घरांची पडझड झाली होती. गेवराई, शिरुर, आष्टी आणि केज या चार तालुक्यामधील पाच घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 75 हजारांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच पुरात वाहून गेल्याने बीड, आष्टी, पाटोदा, माजलगाव व गेवराई व केज या तालुक्यात 15 जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यासाठी एकुण 4 लाख 62 हजारांचा निधी शासनाने जिल्हा प्रशासनाला मंजुर केला आहे. दि.23 सप्टेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Leave a comment