बीड | वार्ताहर
केज तालुक्यातील धनेगाव येथील जिल्ह्यातील दुसरे मोठे धरण असलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे आता बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा पाणी प्रश्न सुटला आहे.काल मंगळवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे आज बुधवारी (दि.२२) सकाळी ६ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. दरम्यान यापूर्वी माजलगाव धरणही ओव्हर फ्लो झाल्याने या धरणाचेही दरवाजे उघडण्यात आलेले होते.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या माहितीनुसार, आता जिल्ह्यातील १४४ पैकी ११५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. केजच्या मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. काल सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता उजव्या कालव्यातून १.२७ प्रतीसे.घ.मी. वेगाने पाण्याचा विसर्ग सरू करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आणि बुधवारी पहाटेपर्यन्त धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाला.
त्यामुळे सकाळी ६ धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. सहा वर्षांच्या दुष्काळानंतर २०१६ साली झालेल्या मुसळधार पावसाने या धरणाचे धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. त्यानंतर अपवाद वगळता नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही निसर्गाने भरभरून दान दिल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले असून दरवाजे उघडण्याचा सुखावह प्रसंग आज अनुभवयास मिळाला असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Leave a comment