श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा
साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
बीड | वार्ताहर
सुखकर्ता व विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाने आसमंत प्रफुल्लित होऊन जातो. ऐन पोळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या कृपेने शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटातून मुक्ती व दिलासा मिळावा अशी प्रार्थना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या जलसंकटातून मुक्ती मिळण्यासाठी व पुन्हा उभारी घेण्यासाठी श्री गणेशाकडे साकडे घातले आहे.
बीड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरी करण्याची परंपरा आहे. सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी श्री गणेश प्रतिष्ठापना करून दहा दिवस नित्य पूजन केले जाते. सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे दहा दिवस सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते.मात्र कोरोनाच्या सावटाखाली मागच्या वर्षीपासून गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात असून, याही वर्षी सार्वजनिक उत्सवावर प्रशासनाने नियमावली आखून दिली आहे. या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
Leave a comment