नवी दिल्ली: नवे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी मागील अनेक महिन्यांपासून देशातील शेतकरी हे राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. असं असताना आता दुसरीकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 हंगामासाठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य (MSP) वाढवलं आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाने यंदाच्या रब्बी हंगामासाठी पिकांचे किमार आधार मूल्य (MSP) निश्चित केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने आज बुधवारी या एमएसपीला मंजुरी दिल्यानंतरच रब्बी हंगामाच्या पिकाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार गव्हाचा हमीभाव ४० रूपये, हरभरा १३० आणि मोहरीला ४०० रूपयांची वाढ मिळाली आहे. कॅबिनेट बैठकीत कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा झाल्या आहेत.
रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा हा गहू, हरभरा आणि मोहरी उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी प्रोत्साहन निधीच्या स्वरूपात १० हजार ६८३ कोटी रूपये प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह (PLI) योजना मंजूर करण्यात आली आहे. तर प्रोत्साहनपर निधीअंतर्गत ५ वर्षांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून नव्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. नव्या कृषी कायद्याला विरोध होण्यासाठीच्या कारणांपैकी एक कारण हे एमएसपी आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून केंद्र सरकारने कृषी कायद्याला होणाऱ्या विरोधाचा एक मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या कृषी कायद्याच्या निमित्ताने एमएसपी रद्द होणार का ? असा वारंवार प्रश्न शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यानंतरच केंद्राकडून एमएसपीची घोषणा करण्यात आली आहे.
रब्बी पिकांसाठी MSP (2022-23)
गहू: 2015 रु. प्रति क्विंटल ( MSP मध्ये 40 रुपयांची वाढ)
मोहरी : 5050 रु. प्रति क्विंटल (MSP मध्ये 400 रुपयांची वाढ))
सूर्यफूल: 5441 रु. प्रति क्विंटल (MSP मध्ये 114 रुपयांची वाढ)
मसूर डाळ : 5500 रु. प्रति क्विंटल ( MSP मध्ये 400 रुपयांची वाढ)
हरभरा : 5230 रु. प्रति क्विंटल (MSP मध्ये 130 रुपयांची वाढ)
बार्ली: 1635 रु. प्रति क्विंटल (MSP मध्ये 35 रुपयांची वाढ)
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार?
दरम्यान, या एमएसपी वाढीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सरकारकडून ज्या पिकांवर एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ती पिकं मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात घेतली जातात. अशावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काय तरतूद करणार याकडे देखील बळीराजाचं लक्ष लागून राहिलं आहे.
Leave a comment