आरोग्यसेवा वार्यावर सोडून गैरहजर राहणार्या
अधिकारी,कर्मचार्यांचे वेतन केले कपात
बीड । वार्ताहर
कोरोना महामारीच्या संकट काळातही जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा रामभरोसेच सुरू असल्याचे शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केलेल्या स्टींगमध्ये स्पष्ट झाले. शुक्रवारी त्यांनी तालखेडच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात अचानक भेट देवून वॉर्डाचा राऊंड घेतला. यावेळी चक्क वैद्यकीय अधिक्षकांसह इतर वैद्यकीय अधिकारी आणि रूग्णालयीन कर्मचारीही कर्तव्यावर गैरहजर आढळून आले. याशिवाय या रूग्णालयात प्रचंड त्रुटी आढळून आल्याने शल्यचिकित्सक डॉ.साबळेंनी संताप व्यक्त करत गैरहजर राहिलेल्या सर्वच अधिकार्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करत फोनवरून कानउघडणी करत सर्वांनाच कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांनी केलेल्या या स्टींगमुळे आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात किती कर्तव्यदक्षतेने रूग्णांना सेवा देत आहे याची प्रचिती आली. शासनाचा लाखो-हजारो रूपयांचा महिनाकाठी पगार घेवूनही रूग्ण सेवेकडे दुर्लक्ष करत दांडी मारणार्या वैद्यकीय अधिकार्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. तालखेड येथे पोहचल्यानंतर सीएस साबळे यांनी सर्व परिस्थिती जाणून घेतली तेंव्हा गंभीर त्रुटी दिसून आल्या. यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तालखेड मुख्यालयी न थांबता इतरत्र ठिकाणाहून ये-जा करतात. तसेच वरिष्ठांची परवानगी न घेता डिवटीवर गैरहजर राहत असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय या ग्रामीण आरोग्य रूग्णालयात कोणतेही लसीकरण केले जात नसल्याची गंभीर बाब पुढे आली. रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिला रूग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कोरोना विषयक आरटीपीसीआर व अँटीजेन टेस्ट पुरेशा प्रमाणात केले जात नसल्याचे दिसून आले. रूग्णालयातील नोंदवह्या ही अद्यावत नसल्याचे दिसून आले. बाह्य रूग्ण शुल्क व आंतररूग्ण शुल्काबाबत शासकीय सूचना नुसार कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून आले. या सर्व बाबी लक्षात घेवून डॉ.साबळे यांनी गैरहजर राहणार्या सर्वच डॉक्टर व कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करत त्यांना शोकॉज नोटीस जारी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांच्या या कारवाईमुळे गैरहजर राहून शासनाचा पगार उचलणार्या अधिकारी,कर्मचार्यांमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे.
केस पेपरही लिहित होते पेन्सीलने!
सरकारी निवासस्थानात राहणारा मेखे कोण?
तालखेड ग्रामीण रूग्णालयात डॉ.साबळेंनी दिलेल्या सरप्राईज व्हिजीटमध्ये अनेक गंभीर बाबी स्पष्ट झाल्या. याबरोबरच ज्या डॉक्टरांकडे आदराने पाहिले जाते ते डॉक्टरच रूग्ण सेवेच्या बाबतीत प्रचंड उदासीन असल्याचे दिसून आले. पाहणी दरम्यान या रूग्णालयात बाह्य रूग्ण रूग्णालयात केस पेपर पेन ऐवजी पेन्सिलने दिले जात असल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर अंतररूग्ण विभागात जमा होणारे रूग्ण शुल्क जमाच केले जात नाही. कोव्हिड लसीकरणही रूग्णालयात सुरू नाही. वैद्यकीय अधिकारी आणि अधिक्षक तसेच कंत्राटी कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. एमएलसी नोंदणी रजिस्टरही याठिकाणी दिसून आले नाही. कनिष्ठ लिपीक गैरहजर दिसूून आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ग्रामीण रूग्णालय परिसरातील एका निवासस्थानामध्ये मेखे नामक अनाधिकृत व्यक्ती राहत असल्याचे दिसून आले.
Leave a comment