आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी!
नवी दिल्ली :
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता घटताना दिसत आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहेत. तसेच या तिसऱ्या लाटेच प्रोढांपेक्षा अधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्याजात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींची पूर्तता केली जात आहे. अशातच केंद्र सरकारनं आता लहान मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.
यामध्ये मास्क घालण्याची वयोमर्यादा देखील सांगितले आहे. या गाईडलाईननुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही आहे. पण सहा ते ११ वर्षांवरील मुलं पालक आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुखवटा घालू शकतात. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापर करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
DGHSने १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कोरोनाबाधित मुलांवरील उपचार आणि बचावासाठी गाईडलाईन्स दिली आहे. या गाईडलाईन्सनुसार, लहान मुलांच्या उपचारात रेमडेसिवीर इंजेक्शन वापर करू नये. संसर्गाची चाचणी करण्यासाठी सीटी स्कॅन उपयोग तर्कसंगतपणे करावा. याशिवाय मुलांवर कोरोना संसर्गावर उपचारासाठी स्टिरॉईड सुद्धा नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे स्टिरॉईडची पर्याप्त मात्रा योग्य वेळी, योग्य प्रमाणात वापरली जावी, असे सांगितले गेले आहे. शिवाय मुलांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन वापरासाठी DGHSने स्पष्ट सांगितले आहे की, ‘तीन वर्षांपासून ते १८ वर्ष या वयोगटात यामुळे बरे झाल्याचे पर्याप्त आकडे उपलब्ध नाही आहेत. अशा परिस्थितीत मुलांवर रेमडेसिवीरचा वापर करू नये.’ शिवाय सीटी स्कॅनचा वापर करण्याबाबत सल्ला देताना DGHS म्हणाले की, ‘छातीचे स्कॅन केल्याने उपचारांमध्ये थोडीशी मदत होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी कोरोना रुग्णांमधील निवडक केसेसमध्ये एचआरसीटी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.’ दरम्यान कोरोनाची तिसरी लाट मुलांना घातक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गाईडलाईन्स जारी केली आहे.
Leave a comment