बीड परिसरात जोरदार पाऊस

बीड । वार्ताहर
मान्सूनपूर्व सरींनी तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. शेतकर्‍यांकडून खरीप मशागतीची कामे पूर्ण होत असतानाच रोहिणी नक्षत्रात वेळेवर पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.  बुधवारी (दि.2) रात्री बीड शहर परिसरात जोरदार पाऊस झाला.  दरम्यान यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या दोन दिवसात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 13.2 टक्के पाऊस झाला आहे.
गतवर्षीपासून महावेध कडून महसूल मंडळनिहाय दैनंदिन पर्जन्यमानाची मोजणी केली जाते. जिल्ह्यात 1 व 2 जूनला सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसादरम्यान वादळीवार्‍यामुळे काही ठिकाणी फळपिकांचे नुकसान झाले. अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 25.4 टक्के पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील अकराही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दोन दिवसात 13.2 टक्के इतका पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस: बीड-5.2, पाटोदा-8.7 टक्के, आष्टी-6.8, गेवराई- 19.7, माजलगाव-12.1, अंबाजोगाई-25.4, केज-14.6, परळी-13.2,धारुर-23.5, वडवणी-8.8 आणि शिरुरकासार तालुक्यात 14 टक्के पाऊस झाला आहे.

पहिल्याच पावसात माजलगाव शहरात रस्त्यासह घरांत पाणीच पाणी

शहरात नगरपालिकेद्वारे मान्सूनपूर्व कामे होणे अपेक्षित असताना नगरपालिकेने त्यास बगल दिली. यामुळे सोमवारी संध्याकाळच्या दरम्यान अर्धा तास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने अनेक भागांत अनेकांच्या घरात व दुकानांत पाणीच पाणी झाले होते.
माजलगाव नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर देऊनही शहरातील अनेक भागातील नाल्या अद्याप काढलेल्याच नाहीत. असे असताना संबंधित ठेकेदाराला नगरपालिकेचे पदाधिकारी ना मुख्याधिकारी त्यास काही बोलतात. त्याचाच गैरफायदा संबंधित ठेकेदार घेत असताना दिसत आहे. यामुळे शहरातील नाल्या जागोजागी तुंबल्याने भर उन्हाळ्यामध्ये नाल्यांचे पाणी रस्त्यावरून जाताना दिसत होते.पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेकडून एप्रिल-मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे होणे आवश्यक होते. पावसाळा सुरू व्हायला केवळ आठ दिवस बाकी आहेत. सोमवारी माजलगाव शहरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. नाल्या तुंबलेल्या असल्याने व पहिलाच पाऊस जोरदार झाले हे सर्व पाणी नाली वाटेन जाता रस्त्यावरून वाहत होते. शहरातील मठगल्ली, मशीद चौक, गोंदणी चौक, झेंडा चौक भागातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी वाहत होते. त्यामुळे या भागातील अनेक घरांत घाण पाणी गेल्याने घरात घाण साचून दुर्गंधी पसरली होती.
आंबेडकर चौकातून मोंढयात जाणार्‍या रस्त्यांवरदेखील अनेक महिन्यांपासून पाणी साचत असताना नगरपालिकेने याकडे साधे लक्षदेखील दिले नाही. दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणच्या व्यापार्‍यांनी पाण्यात बसून आंदोलन केली असतानादेखील नगरपालिकेला जाग आली नाही. नगरपालिकेच्या चुकीमुळे सोमवारी पडलेल्या पावसात या भागातील आणि दुकानात पाणी गेल्याने अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरू केलेली नाहीत. येत्या दोन दिवसांत मान्सून पूर्व कामाला सुरुवात करण्यात येईल.

गेवराई तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस

शहर आणि परीसर बुधवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून रोज सायंकाळी पाऊस पडत असून, नदी नाल्यांना पूर आला आहे.गेवराई तालुक्यात खरीप हंगामात जवळपास एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्र शेतीसाठी उपयोगात आणले जाणार असून, पावसाचे शुभ संकेत सुखावणारे आहेत.
या क्षेत्रात कापूस लागवडीला महत्त्व दिले जात असून, उसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुसर्या क्रमांकावर आहे. पूर्वी सर्वाधिक शेतीत उसाची लागवड केली जायची. परंतू , कालौघात या पिकाकडे दिवसेंदिवस दूर्लक्ष झाले आहे. अलीकडच्या काळात पून्हा उसाकडे कटाक्ष टाकला जात असला तरी कापूस उत्पादन करणारी शेती नंबर एकवर आहे. यंदाच्या खरीप हंगामात कपासी, तूर, मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन पिकांना प्राधान्य असणार आहे. तालुक्यातून गोदावरी, सिंदफना आणि उजवा कालव्याच्या आधाराने शेती केली जाते. या आधारावर पाणलोटक्षेत्रात येणारी हजारो हेक्टर शेतजमीन कुरणपिंप्री ,राक्षसभुवन, बेलगाम, कोल्हेर, जातेगाव, तलवडा, सेलू पांचाळेश्वर, सुरळेगाव परीसरात असून काही भाग सिंदफणा व गोदा नदीकाठावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान राहील्याने, शेत पिंकाना फायदा होऊन, आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे.गेल्या वर्षी ही कापूस,तूर आणि मुगाचे चांगले पिक आल्याने उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळून हाती चांगला पैसा अडका आल्याने शेतीला सुगीचे दिवस पहायला मिळाल्याने शेतकरी आनंदात होता. यंदाचे पावसाळी संकेत पॉझिटिव्ह दिसत असल्याने खरीप हंगाम चांगला राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन दिवसापासून शहरात व परिसरातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, वादळी वार्‍यासह परीसर झोडपून काढला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.