100 मि.मी.पावसाशिवाय पेरण्या नको

बीड । सुशील देशमुख

जिल्ह्यात गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र 10 हजार 400 हेक्टरने वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. या प्रस्तावित क्षेत्रासाठी शेतकर्‍यांना बी-बियाणे,खतांचा आवश्यक साठा उपलब्ध करुन घेतला जात आहे. शेतकर्‍यांनी वळवाच्या पावसावर पेरणी न करता 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय खरीपाच्या कोणत्याच पिकांची पेरणी करु नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात खरिप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर मुग, उडीद ही प्रमुख पिके घेतली जातात. गत वर्षी जिल्ह्यात खरिपाची 7 लाख 81 हजार 532 हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र हे क्षेत्र 10 हजार 400 हेक्टरने वाढेल असा अंदाज आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यात खरिपाचे 7 लाख 91 हजार 932 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित दाखवण्यात आले आहे.खरिपात सर्वाधिक हेक्टरवर कापूस लागवड होत असली तरी मागील पाच वर्षाच्या तुलनेत 25 हजार 548 हेक्टरवर घट होण्याचा अंदाज आहे. बहुसंख्य शेतकरी कापसाऐवजी इतर पिकातून उत्पादन घेण्याच्या मानसिकतेत आहेत. कापसावर पडणारी अळी, शिवाय वेचणीचे वाढलेले दर या व इतर अडचणीमुळे खरिपातील इतर तिमाही पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे.


यंदाच्या हंगामात कृषी विभागाकडून कापसासाठी 3 लाख 32 हजार 5 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे, गत पाच वर्षात कापसाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 57 हजार 553 हेक्टर होेते. त्यात आता घट होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व सरी बरसू लागल्या आहेत. आणखी तीन दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व शेत मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. चांगला पाऊस झाला की, पेरण्यांना वेग येणार आहे.  या पार्श्वभूमीवर कृषी विभागानेही आवश्यक तो बियाणे साठा करण्यावर भर दिला आहे. तसेच शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बीड जिल्हा स्तरावर 1 व प्रत्येक तालुकास्तराव 1 असे एकूण 12 पथके स्थापन केली गेली आहेत. शेतकर्‍यांसाठी बी-बियाणे मुबलक प्रमाणात आहेत मात्र विशिष्ट वाणाचा आग्रह धरु नये तसेच रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.दरम्यान दरवर्षी जिल्ह्यात कपी अधिक प्रमाणात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा शेतकर्‍यांना 1 जूननंतरच कापूस बियाणे विक्री करावेत, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे 15 मे नंतर होलसेल कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून रिटेलरला विक्री होईल.

कपाशीच्या साडेचौदा लाख पाकीटांची मागणी

जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने सुमारे 14 लाख 50 हजार इतक्या बियाणे पाकिटांची मागणी कृषी विभागाने नोंदवली आहे. आतापर्यंत 6 लाख 29 हजार पाकिटे प्राप्त झाली आहेत. तसेच सोयाबीनचे जिल्ह्यातील 2 लाख 59 हजार 816 हेक्टर प्रस्तावित क्षेत्र लक्षात घेता स्थानिक पातळीसह महाबीजकडून 21 हजार 77 क्विंटल बियाणे उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली.

2 लाख 76 हजार मे.टन खत लागणार!

जिल्ह्यात खरिप हंगामातील पिकांसाठी कृषी विभागाने तब्बल 2 लाख 76 हजार 925 मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. यापैकी  सध्या जिल्ह्यासाठी 1 लाख 64 हजार 986 मे. टन खत मंजूर झालेले आहे. तसेच गतवर्षीचे 84 हजार 566 मे. टन खत शिल्लक होते. युरीयाची 91 हजार 140 मे.टन, डीएपी 38 हजार 303 मे.टन, एमओपी 35 हजार 405, एसएसपी 28 हजार 866 मे.टन. व एनपीके खताची 83 हजार 211 मे.टन मागणी करण्यात आली आहे.

 

खरीप हंगामाचे पीकनिहाय क्षेत्र

कापूस 3 लाख 32 हजार हेक्टर
सोयाबीन 2 लाख 59 हजार,
बाजरी 64 हजार 699
मका 9 हजार 408
तूर 61 हजार 308
मूग 22 हजार 293
उडीद 27 हजार 617
भूईमूग 4 हजार 284

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.