नव्याने आठ जणांवर उपचार सुरु;एक मृत्यू
बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूनंतर म्युकरमायकोसिचा विळखा घट्ट होत चालला आहे. सोमवारी (दि.31) अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात नव्याने 8 रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर नेत्रतज्ञांच्या निगराणीखाली उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान सोमवारी एक रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला;त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या 19 झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वंतत्र कक्ष स्थापन केला जात आहे.
पोस्ट कोव्हिड रुग्णांपैकी काही रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत आहे. यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सध्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत या ठिकाणी 117 रुग्णांवर उपचार केले गेले. यामध्ये काही रुग्ण बाहेर जिल्ह्यातील देखील आहेत. दाखल झालेल्या एकूण रुग्णांपैकी 78 जणांवर उपचार सुरु असून 20 रुग्ण उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाल्याने घरी परतले आहेत. तर आजपर्यंत 19 जणांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू ओढवला आहे. सोमवारी नवे 8 रुग्ण दाखल झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण 45 वयांपेक्षा अधिक वय असलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व महाविद्यालय अशा दोन वार्डात स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करण्यात आले असून या ठिकाणी 10 नेत्रतज्ञ डॉक्टर तसेच 10 कान,नाक,घसा तज्ञ कार्यरत आहेत. या शिवाय मेडिसीन विभागात 10 तर परिचारिका, वॉर्डबॉय असा एकूण 24 कर्मचारी कार्यरत झाले आहेत.
Leave a comment