पोस्ट कोव्हिड रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती संकलित करणार
सर्व तालुका अधिकार्यांना सूचना;आशा कार्यकर्तींवर जबाबदारी
बीड । सुशील देशमुख
कोरोना विषाणूनंतर म्युकरमायकोसिसचा विळखा घट्ट होत चालला आहे. महत्वाचे हे की, पोस्ट कोव्हिड म्हणजेच कोरोना होवून गेलेल्या रुग्णांना या आजाराची लागण होत असल्याचेही आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. हाच धागा पकडून म्युकरमायकोसिसच्या संशयित रुग्णांना वेळीच उपचार मिळवून देण्यासाठी आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भात सर्व आरोग्य अधिकार्यांशी व्हीसीव्दारे बैठक घेतली. त्यानंतर आता जिल्हाभरात म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांच्या मार्फत गावोगावी हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्युकरमायकोसिस रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. सध्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत 96 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये काही रुग्ण बाहेर जिल्ह्यातील देखील आहेत. दरम्यान, आतापर्यंत 96 रुग्णांपैकी 42 रुग्णांवर शस्त्रक्रीया झाल्या असून 15 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या 66 रुग्ण उपचाराखाली आहेत. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण 45 वयांपेक्षा अधिक वय असलेले आहेत.
म्युकर मायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या संदर्भात राज्याच्या आरोग्य संचालकांनी सर्व जिल्हा आरोग्य अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे बैठक घेतली.नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व आशा कार्यकती व गट प्रवर्तकांची व्हीसीव्दारे बैठक घेवून त्यांना म्युकरमायकोसिचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या गेल्या.त्यानुसार शुक्रवारपासून (दि.28) जिल्ह्यात या सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे.
महत्वाचे म्हणजे ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली व ते उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांना आता पोस्ट कोव्हिडमध्ये म्युकर मायकोसिसचे संकट ओढवले जात आहे. अर्थात हा आजार सर्वांनाच होतो असे नाही. असे असले तरी आता अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांच्या मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रुग्ण सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे लक्षणे दिसून येत असतील तर त्यांना ‘संशयित म्युकर मायकोसिस’ रुग्ण समजून तात्काळ रुग्णालयात उपचार सुविधा दिली जाणार आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकार्यांच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आढळून आलेल्या म्युकर मायकोसिसच्या संशयित रुग्णांची माहिती विहित नमुन्यात नोंदवून दररोज ती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला पाठवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
लक्षणांची होणार स्वतंत्र नोंद
आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्तींकडून पोस्ट कोव्हिड रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली जाईल. या रुग्णांमध्ये डोळे व नाक लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची उलटी होणे तसेच मानसिक स्वास्थ्यांमध्ये बदल जाणवणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांची नोंद आरोग्य विभागाकडून स्वतंत्रपणे केली जाणार आहे. यात संशयित रुग्णांचे नाव, वय, लिंग, पत्ता याशिवाय लक्षणे सुरु झाल्याची तारीख याबाबतची माहिती नोंदवली जावून रुग्णास तातडीने उपचार सुविधा दिल्या जाणार आहेत.
रुग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी सर्वेक्षण
जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. या संदर्भात गुरुवारी जिल्ह्यातील सर्व आशा कार्यकती व गट प्रवर्तकांची व्हीसीव्दारे बैठक घेवून त्यांना म्युकरमायकोसिचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाची लागण होवून उपचार पुर्ण केलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करुन त्यांना काही लक्षणे जाणवतात का, याबाबतची माहिती संकलीत करुन आम्हाला रिपोर्ट करतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना दिली.
म्युकर मायकोसिसचे आणखी चार बळी
म्युकरमायकोसिच्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी (दि. 28) नव्या सात रुग्णांची भर पडली तर चार मृत्यूंची नोंद झाली.जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 96 रुग्ण आणि 17 मृत्यूंची नोंद झाली.अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 42 रुग्णांवर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे.एकूण रुग्णांची संख्या 96 झाली आहे तर 13 मृत्यूंमध्ये आणखी चारने भर पडून हा आकडा 17 झाला आहे. सध्या 66 रुग्ण उपचाराखाली आहेत.
जिल्ह्यात केवळ ‘स्वाराती’मध्ये उपचार कक्ष
सध्या जिल्ह्यात केवळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये यासाठी स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आजपर्यंत दाखल झालेल्या 89 रुग्णांपैकी 11 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. कारण ते कोव्हीड पॉझिटिव्ह असून ते रुग्ण ऑक्सीजन बेडवर उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस रुग्णांना भूल देवून शस्त्रक्रिया करावी लागते, त्यामुळे कोरोनामुक्त होईपर्यंत या रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येणे शक्य नाही असे स्वाराती रुग्णालयाचे नेत्रविभागप्रमुख डॉ.भास्कर खैरे यांनी सांगीतले.
Leave a comment