------------- रघुनाथ कर्डीले------------
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला कड्यात मौलाली बाबांचा उत्सव आनंदाने साजरा केला जातो.या उत्सवात कडेकर न्हाऊन निघत असल्याचे मी वर्षानुवर्षे पाहत आलो आहे. वृद्धपासून ते लहान मुलं यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात.परंतु यात्रेला सलग दुसऱ्या वर्षीही "पौर्णिमेच्या चांदण्याला" कोरोना विषाणूने डाग लावला आहे
देवळात देव आहे की नाही हा वादाचा विषय अगदी पूर्वीपासूनच! यंदा मात्र मी पाहतोय 'याचि देही याचि डोळा' लोकांनी मनोभावे घरातूनच केलेली पूजा ..तितक्याच श्रध्देने!
दारात येऊन उभा असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे जमावबंदी आदेशाची पायमल्ली न करता प्रत्येकाने आपापल्या घरूनच हात जोडून,फुलं वाहून साजरी केलीय! परंतु. वा-यासारख्या वेगानं वाहणाऱ्या मनाला कोण आवरणार सांगा ना? ते कित्येकदा जाऊन आलंय दर्ग्यातून ,तिथल्या परिसरातून हेही अगदी खरं! बुजूर्ग सांगतायेत इथल्या उत्सव परंपरेला शेकडो वर्षांची परंपरा आहे.कित्येक पिढ्या खपल्या पण यात्रा कधीच बंद झाली नव्हती..पण मागील वर्षांपासूनव मात्र हे सगळं भयावह!
यात्रा ही केवळ दोन - चार दिवसांचा उत्सव नसतो!वर्षभर सासुरवासात थांबलेली लेक एकवेळ पंचमीला,दिवाळीला माहेरी येणार नाही... पण गांवी यावं वाटतं तिला ना..ती गावची यात्रा असल्यावर !!!! तिच्या बालपणीच्या मैत्रिणींना कडकडून मिठी मारून सगळं 'अलबेल' असल्याचं सांगण्याचा असतो तो दिवस! पाच-दहा हजाराच्या नोकरीसाठी का होईना पण दूरदेशी गेलेली गांवातील तरूण मुलं आपल्या गांवच्या कुशीत येतात,घरच्यांत रमतात,ख्याल-खुशाली दोस्तांना सांगतात तो हा दिवस! माय-लेकरांची भेट होण्याचा हा दिवस,भावा-भावाच्या मनाचा समेट होताना 'मी यात्रेला आलो की मग पाहू' असं विश्वासाने सांगण्याचा दिवस!आपल्या माणसांच्या हातावर 'खर्ची' म्हणून पैसै वाटताना नात्यातला विश्वास जागवण्याचा हा दिवस! कुणी नवस करतंय तर कुणी नवस फेडतंय.. खरंच गांव कसाही असो,तिथली यात्रा प्रत्येकाच्या काळजाचा विषय असतो!
जमावबंदी अन् दर्ग्यात जाण्यास मज्जाव असला म्हणून काय झालं*? *वर्षातल्या 365 दिवसांत देवावरील श्रद्धेपोटी नित्याने दर्शनासाठी येणारी माणसं आज मागे कशी राहतील*? *भाविकांनी यंदाही मनामनात यात्रोत्सव साजरा केलाय*!
कोण म्हणतं यात्रा भरली नाही? मनामनातून ओसंडून वाहतेय यात्रा..अगदी चंद्रभागेला पूर आल्यासारखी!
Leave a comment