‘लॉकडाऊन’च्या शिथिलतेवर ४ दिवसात निर्णय – वडेट्टीवार
बीडमध्ये पुन्हा लॉकडाऊन राहणार
मुंबई । वार्ताहर
राज्यामध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी होत असले तरी जवळपास चौदा जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या अजूनही वाढतीच आहे. संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी मृत्यूचे प्रमाण वाढलेलेच आहे. त्यातच या चौदा जिल्ह्यामधील नगर अन्य दोन जिल्ह्यामध्ये बालकांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने या चौदा जिल्ह्यामध्ये 31 मे नंतरही लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच प्रसार माध्यमांशी बोलतांना हे संकेत दिले होते.
‘राज्यात ज्यावेळी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या दरम्यान जनतेकडून लॉकडाऊन लावण्याची मागणी झाली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु, आता जसजसे कोरोनावर नियंत्रण मिळवले जात आहे आणि रुग्णसंख्या घटत आहे, त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा जनतेकडून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार पुढील चार दिवसात ‘लॉकडाऊन’च्या शिथिलतेवर निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
राज्यातील १४ जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्याठिकाणी शिथिलता करावी, अशी मागणी केली तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे जे परिसर हॉटस्पॉट आहेत. त्याठिकाणी कडक लॉकडाऊन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ज्याठिकाणी रुग्णसंख्या घटली आहे तिथे नियम शिथिल करावे लागणार आहेत.
रेड झोनमधील जिल्हे
बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.
आता यलो फंगसचा धोका
आधीच कोरोनाचं संकट असताना त्यात ब्लॅक फंगसच्या आजाराने विळखा घातला. त्यानंतर लगेच व्हाईट फंगसनेही थैमान घातले. आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
Leave a comment