पुणे  । वार्ताहर

 

 कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर काँग्रेस खासदार राजीव सातव  यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राजीव सातव यांना आता न्युमोनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर पुण्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती देण्यात आली आहे.  सातव यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने 25 एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आले होते. 

दरम्यान, राजीव सातव यांना आता न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  कोरोनाची लागण झाल्यामुळे सातव यांना खूप धकवा जाणवत होता. त्यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी जहांगीर रुग्णालयाला भेट देत सातव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर कदम यांनी प्रकृती स्थिर असून ते कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर नक्की मात करतील, अशा विश्वास व्यक्त केला होता.

 

राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून थोडे बरे वाटत नव्हते. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली. 22 एप्रिल रोजी या रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी ट्विट करत संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन केले होते.

मागील आठवड्यातच राजीव सातव यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. याशिवाय काँग्रेस नेत्यांनीही डॉक्टरांच्या भेटीनंतर सातव यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं.

23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.

 

जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. पण कोरोनावर मात केल्यानंतर पुढील उपचार सुरू असतानाच त्यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्या त्यांना वेंटीलेटवर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सकडून देण्यात आली होती. पण त्यांना पुन्हा ऑक्सिजनची गरज भासत असल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. राजीव सातव यांची १० मे रोजी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते यांनी जहांगीर हॉस्पिटल येथे जमायला सुरूवात केली आहे. तर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हेदेखील राजीव सातव यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे कळते.

 

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 

22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

 

 

कोण आहेत राजीव सातव?

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. 

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राज्यसभेवर वर्णी

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.