यालाच म्हणतात सुनील केंद्रेकर
उंटावर बसून कारभार न हाकता थेट गेवराईच्या रुग्णालयात
गेवराई । वार्ताहर
मंगळवारी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राणवायूची आणीबाणी निर्माण झाली होती. गेवराईतील रुग्णसेवा समितीच्या सदस्यांनी ऑक्सिजनअभावी 60 रुग्णांचा मृत्यू होवू शकतो त्यामुळे तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची विनंती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांना केली होती.त्यांनी यामध्ये लक्ष घालून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले पण तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. बुधवारी सकाळीच त्यांनी थेट गेवराईचे उपजिल्हारुग्णालय गाठले. जवळपास 2 तास आढावा घेवून रुग्णालयात काम करणार्या डॉक्टरांना तंबी दिली. गोरगरीबांचे जीव वाचवा चुका केल्या तर माफ करणार नाही. चांगले काम करा, जनतेचा आशिर्वाद मिळवा नाहीतर माझ्याशी गाठ आहे अशी तंबी देत वैद्यकीय अधिकार्यांसह , महसूल प्रशासनातील अधिकार्यांचेही काम टोचले. स्वतः गेवराईला येवून सगळा आढावा घेवून बाहेर असलेल्या नागरिकांशी चर्चाही केली आणि रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच गेवराईकरांनाही दिलासा दिला. काळजी करु नका, मी तुमच्या समवेत आहे. प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. गेवराईत एकच चर्चा झाली यालाच म्हणतात सुनील केंद्रेकर. एखादा दुसरा अधिकारी असता तर त्याने कार्यालयात बसूनच सुचना केल्या असत्या परंतु सुनील केंद्रेकरांनी उंटावर बसून कारभार न हाकता थेट गेवराई गाठली.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले की, सध्या अतिशय कठीण काळ उभा राहीला असून, सर्व सामान्य रुग्णांना , या महामारीत सहकार्य करण्याची जबाबदारी डॉक्टरांची आहे. त्यामुळे, समन्वय ठेऊन रुग्णांना आरोग्य सुविधा द्यायची जबाबदारी प्रमाणीकपणे पार पाडा, नसता उद्याचा काळ तुम्हाला माफ करणार नाही, अशी रोखठोक भूमिका औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केन्द्रेकर यांनी येथे मांडली आहे. बुधवार ता. 12 रोजी आयुक्त केंद्रेकरांनी दुपारी बारा वाजता ,येथील उपजिल्हा रूग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष कोरोना सेंटर विभागात जाऊन रुग्णांशी संवाद साधून, आरोग्य विभागाची पहाणी केली. दरम्यान, गेवराई येथील रुग्ण सेवा समितीने केन्द्रेकरांना निवेदन देऊन, विविध विषयावर चर्चा केली. सेवा समितीच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आ. लक्ष्मण पवार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. चिंचोले, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, न.प.चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ. राजेश शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागातल्या रुग्णांसाठी आवश्यक असलेला प्राणवायूचा पुरवठा वेळेवर उपलब्ध न झाल्याने उपचार घेणार्या 60 कोरोना बाधितांचा जीव धोक्यात सापडल्याचा प्रकार मंगळवार दि.11 रोजी समोर आला होता. रूग्णसेवा समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार थेट भ्रमणध्वनीवरून विभागीय आयुक्त सुनील केेंद्रेकर यांना कळविल्यानंतर त्यांनी आरोग्य यंत्रणेला तातडीने कामाला लावत ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था करून दिली होती.
बुधवार दि.12 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तातडीने गेवराई उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रूग्णालयात कोरोना बाधितांवर केल्या जाणार्या उपचारांचा आढावा तर घेतलाच तसेच कोव्हिड कक्षात जाऊन थेट रूग्णांची त्यांना मिळणार्या उपचाराबाबत चर्चा केली. कोरोना बाधितांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा द्या, हलगर्जीपणा करू नका, डॉक्टरांनी वरिष्ठांच्या समन्वयाने काम करावे, ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही याकडे लक्ष द्यावे असे निर्देशही आयुक्त केंद्रेकरांनी दिले.
गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात सध्या उपचार घेणार्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी या रूग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासू नये अशी व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. परंतू ,मंगळवार दि.11 रोजी रूग्णांना ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता. हा प्रकार रूग्णसेवा समितीच्या पदाधिकार्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसीलदार सचिन खाडे यांना याबाबत माहिती दिली होती. आयुक्त केंद्रेकरांनाही फोनवरून ऑक्सीजन तुटवड्याबाबत कळविले होते. केंद्रेकर यांनीच जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना केल्यानंतर तातडीने सिलेंडरचे वाहन उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाल्याने रूग्णांचे प्राण वाचले. आयुक्त केंद्रेकर यांनी बैठकीमध्ये सांगितले की, डॉक्टरांसह सर्व अधिकारी, कर्मचार्यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, रुग्णांचे जीव वाचवा, कामात हलगर्जीपणा करू नका, हलगर्जीपणा दिसून आल्यास थेट निलंबीत करेल, अशी तंबी ही दिली. आलेल्या रुग्णांची अगोदर व्यवस्थीत तपासणी करा, त्याला परिस्थितीनुसार अॅडमिट करा, आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, गरजेनुसार तेवढाच ऑक्सिजन द्या, योग्य ते उपचार करा, रात्री झोपताना गरज पाहून ऑक्सिजन बंद करा, ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घ्या, ऑक्सिजनचा तुटवडा होण्याअगोदर वरिष्ठांना कळवा, वरिष्ठ दाद देत नसतील तर थेट मला कळवा, सर्वत्र ऑक्सिजनची समस्या आहे. त्यामुळे आपल्याला योग्य नियोजन करावे लागेल. स्थानिक अधिकर्यांनी वरिष्ठांसोबत समन्वय ठेवावे, अशा सूचना देत सुनिल केंद्रेकरांनी रुग्णालयांची पाहणी केली. परिस्थिती गंभीर आहे, या परिस्थितीत सर्वांनी समन्वय ठेवत काम करावं, असं आवाहन त्यांनी या वेळी केलं.
रूग्णसेवा समितीचे आयुक्तांना निवेदन
उपजिल्हा रूग्णालयाचा आढावा घेण्यासाठी आलेले आयुक्त सुनील केंद्रेकर यांना कोरोना रूग्णसेवा समितीच्या वतीने अॅड.सुभाष निकम, महेश दाभाडे, संजय काळे, दादासाहेब घोडके, डॉ.अनिल दाभाडे, प्रा.राजेंद्र बरकसे, प्रशांत गोलेच्छा, राजाभाऊ अतकरे, बाळासाहेब सानप व पदाधिकार्यांनी निवेदन दिले. उपजिल्हा रूग्णालयाला हरिओम ऑक्सीजन रिफलिंग एजन्सी व विकास ऑक्सीजन रिफलिंग एजन्सीकडून आवश्यकतेनुसार मुबलक ऑक्सीजन पुरवठा व्हावा, रेमडेसिवीर रूग्णांना तातडीने मिळावे, कोव्हिड संबंधित इतर औषधांचा पुरवठा विनाविलंब व्हावा. तसेच कोरोनाच्या आरटीपीसीआर व अॅन्टीजन टेस्ट किट मुबलक उपलब्ध करून दिल्या जाव्यात या बरोबरच ऑक्सीजनवरील रूग्णांसाठी बायपॅपच्या किमान पाच मशीन उपलब्ध करून दिल्या जाव्यात, ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्सचे 20 ते 25 मशीन द्याव्यात आदि मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.
उपजिल्हा रुग्णालयात जेवनही नाही, अन् औषधोपचारही वेळेवर नाही
येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांसाठी शासनाच्या वतीने जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरातील सौरभ भोजनालय आणि चिंतेश्वर भोजनालय या दोघांना रुग्णांना जेवन पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या दोन्हीही भोजनालयाकडून रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही. शासनाचे पैसे घेवून रुग्णांना उपाशी मारण्याचे पाप भोजनालय चालक करत आहेत त्याचबरोबर रुग्णालयातील नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी रुग्णांना औषध, गोळ्याही वेळेवर देत नाहीत याची तक्रारही केेेंद्रेकरांकडे करण्यात आली. या संदर्भातही रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.चिंचोले यांना लक्ष घालण्याची सूचना करण्यात आली.
डॉ.चिंचोलेसह वैद्यकीय अधिकार्यांनाही झापले
आढावा बैठक चालू असतांना रुग्णालयाच्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या तशाच ठेवून कामात चालढकल करणार्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.चिंचोले यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकार्यांनाही आयुक्त केंद्रेकरांनी चांगलेच बोल सुनावले. गोरगरीबांना उपचार देण्यासाठी मनाचा कोतेपणा दाखवू नका, चूका करु नका, चुकले तर माफ नाही, काम केले तर जनता तुम्हाला डोक्यावर घेईल , गोर गरीबांचे आशिर्वाद पाठिशी घ्या असा सल्ला देत केंद्रेकरांनी वैद्यकीय अधिकार्यांनाही झापले.
मंगळवारी 60 रुग्ण वाचले, शनिवारी 7 दगावले त्याचे काय?
ऑक्सिजनअभावी मंगळवारी 60 रुणांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने हे रुग्ण वाचले त्यापुर्वी शनिवारी ऑक्सिजनअभावी 7 रुग्णांचा जीव दगावला. त्याची जबाबदारी कोणावर टाकायची याबद्दल कोणीही केंद्रेकरांना माहिती दिली नाही. मात्र आढावा बैठक झाल्यानंतर या संदर्भात जोरदार चर्चा झाली.
Leave a comment