स्वारातीत पाच रुग्ण अतिगंभीर;एकाचा मृत्यू
माजलगावमध्येही पाच जणांवर उपचार सुरु
बीडमध्ये सौम्य लक्षणे असलेले तीन रुग्ण सापडले
बीड । वार्ताहर
कोविडच्या दुसर्या लाटेचा हाहाकार माजलेला असतांनाच कोविड पश्चात होणार्या म्युकोरमायकोसीसने (बुरशीजन्य संसर्ग) या आजाराने आत डोके वर काढले आहे. या आजाराचे अनेक रुग्ण अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. यापैकी पाच रुग्ण अतिगंभीर स्वरुपाचे आजारी असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी स्वारातीत नुकतीच एक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती नेत्ररोग डॉक्टरांनी दिली. दरम्यान माजलगाव शहरातील एका नेत्र रुग्णालयातही या आजाराचे पाच रुग्ण निष्पन्न झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत तर बीड शहरातील खासगी रुग्णालयातही अशा आजाराचे काही रुग्ण आढळून आले आहेत. परंतु त्यांच्यात सौम्य लक्षणे जाणवली आहेत. वेळीच उपचाराने हा आजार दुर होवू शकतो अशी माहिती बीड येथील नेत्ररोगतज्ञ डॉ. राधेशाम जाजू यांनी दिली.
पोस्ट कोवीडच्या रुग्णांत अचानक मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये हा आजार दिसून येत असल्याने प्रशासनासमोर या बुरशीच्या रुपाने नवीन संकट उभे राहिले आहे. खाजगी रुग्णालयासह स्वाराती रुग्णालयातही उपचारासाठी येणार्या अशा रुग्णांची संख्या मोठी आहे. म्युकोरमायकोसीस एक बुरशीजन्य संसर्ग आहे. या आजारात रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. या बुरशीचे रोगजंतू श्वास व त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. आजाराची सुरुवात नाकापासून होते. जे कोविड रुग्ण गंभीर उपचारांतून बाहेर पडले त्यापैकी काहींना सुरुवातीला सर्दी झाल्यासारखी होते. त्यानंतर नाकात सूज आल्याने हळूहळू बंद पडायला लागते. नाकातून काळसर पदार्थ स्रवतो. त्यानंतर तो संसर्ग नाकातील रक्तवाहिनीद्वारे डोळ्यांकडे वेगाने सरकतो. नंतर डोळ्याच्या जवळील भाग बधिर होणे, डोळा बारीक होणे, सुजणे, डोळ्याची हालचाल कमी होणे आणि नजर कमी होते आणि नंतर पूर्णपणे जाते. त्यानंतर हा आजार मेंदूकडे सरकतो आणि मेंदूत जाऊन प्राण जाऊ शकतात. डोळ्यांना लक्षणे दिसून आल्यास तत्काळ शस्त्रक्रिया करून बुरशीचा भाग काढावा लागतो. कधी - कधी जबड्याचा काही भाग शस्त्रक्रियेने काढावा लागतो आणि औषधोपचार सुरू ठेवून उरलेला संसर्ग कमी करावा लागतो.
स्वारातीत झाली एक शस्त्रक्रिया
पोस्ट कोविडची अशीच लक्षणे असलेल्या एका रुग्णावर स्वारातीत एक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. सदरील रुग्णास ब्लॅक फंगस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे त्याचे इन्फेक्शन डोळे, नाक आणि डोळ्याच्या मागील बाजूस झाले होते आणि डोळ्याचा बराचसा भाग बाहेर ही आला होता. रुग्णाची गंभीर परिस्थिती लक्षात घेवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी इएनटी विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे आणि नेत्र विभाग प्रमुख डॉ. भास्कर खैरे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्ण वाढले
म्युकोरमायकोसीस हा तसा जुनाच आजार आहे. परंतु, आधी तो अभावानेच आढळायचा. मात्र, कोविडच्या दुसर्या लाटेनंतर जे कोरोनामुक्त झाले व ज्यांना साखरेचा त्रास आहे त्यांना या बुरशीच्या संसर्गाचा त्रास जाणवत आहे. मात्र, वेळेत उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या आजारावरील उपचारासाठीच्या कसल्याही गाइडलाईन जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने अथवा केंद्रीय व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज पर्यंत देण्यात आलेल्या नसल्यामुळे उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर ही संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी परिस्थिती नुसार योग्य तो निर्णय घेवून आवश्यकते उपचार अथवा शस्त्रक्रिया करून संबंधित रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सध्या स्वारातीतील डॉक्टरांची टीम प्रयत्न करीत आहेत. या आजारासाठी मुख्यत्वे तीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, बुरशीनाशक इंजेक्शन देणे. नाक व सायनसमधील आजार काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करणे
म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?
म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ बुरशीचा संसर्ग आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यामध्ये रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होतो.
आजार तसा जुनाच आहे
म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत प्रमाण वाढत आहे.
म्युकोरमायकोसिस कसा पसरतो?
म्युकोरमायकोसिस हा श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि अवयवांचे नुकसान करतात. फुफ्फुसातील आणि त्वचेमध्ये या बुरशीचा संसर्गास सुरुवात होते.
याची लक्षणे कोणती ?
- तीव्र डोकेदुःखी
- सतत बारीक ताप
- गालावर सूज किंवा बधिरपणा
- नाक गळणे
- हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे
- वरच्या जबड्यातील दातांचे हलणे
- टाळू आणि नाकातील त्वचा काळसर होणे
- जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे
काय काळजी घ्यावी?
कोवीड झालेल्या रुग्णांनी कोवीडची लागण झाल्यानंतर तिसर्या व चौथ्या आठवड्यामध्ये नाक नॉर्मल सलाईनने स्वच्छ करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण पंधराव्या व बाविसाव्या दिवशी तपासून पाहणे, ज्या रुग्णांना कोवीडच्या उपचारांमध्ये इंजेक्शन तोसिलिझुमाब, रेमदेसिविर दिले आहे, तसेच ज्यांना पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे किंवा स्टेरॉइडचे इंजेक्शन,गोळ्या दिल्या आहेत व ज्यांचे शुगर कंट्रोल नाही अशा सर्व रुग्णांनी नाकामध्ये बुरशीची लागण झाली आहे की नाही हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब पंधराव्या व बाविसाव्या दिवशी तपासून घ्यावा. म्हणजे आजाराचे निदान लवकर होऊ शकते. प्राथमिक लक्षणे जाणवताच त्वेळ वाया न घालवता आपल्या जवळच्या फिजिशियन, डोळ्याचे डॉक्टर व नाकाच्या डॉक्टर यांना भेटून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील औषधोपचार करावा असे तज्ञांचे मत आहे.
Leave a comment