सरकारी सेवा सोडून खासगीत मेवा कमवू लागले
बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालयामध्ये शासकीय सेवेत असलेल्या अनेक डॉक्टरांनी कोरोना संसर्गाच्या काळात गोरगरिबांना सेवा देण्याऐवजी जिल्हा रुग्णालयामध्ये अनाधिकृतपणे गैरहजर राहून बाहेर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून कोव्हिड हॉस्पीटल टाकून अक्षरश: धंदा मांडला आहे. खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणार्या रुग्णांना गरज नसतानाही रेमडेसिवीरसारखे इंजेक्शन आणायला भाग पाडून रुग्णालयाचे बील वाढवण्याचा उद्योग ही डॉक्टर मंडळी करित आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात शासकीय सेवेत असलेले डॉक्टर काम कसे करु शकतात? हा प्रश्न आता महत्वाचा राहिलेला नसून जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांनीच आता कोव्हिड हॉस्पीटल सुरु करुन अक्षरश: धंदा मांडला आहे. दहा ते पंधरा दिवस उपचार घेणार्या रुग्णांचे बील पाहिल्यानंतर हा धंदा किती मोठा आहे हे लक्षात येते.
जिल्हा रुग्णालयामध्ये नोकरी करत असताना या डॉक्टरांचा शहरातील विविध क्षेत्रातील लोकांशी तसेच रुग्णांशीही संबंध येतो. त्याचाच फायदा अशा संकटाच्या काळात ही मंडळी घेत आहे. वास्तविक पाहता जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. तेथे दररोज रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तरीही जिल्हा रुग्णालयातील जवळपास 10 ते 15 डॉक्टर अनाधिकृतपणे गैरहजर राहून बाहेर कोव्हिड सेंटरचा धंदा करत आहेत. काही जणांनी स्वत:चे कोव्हिड सेंटर टाकले आहेत तर काही जण दुसर्याच्या कोव्हिड सेंटरमध्ये काम करत आहेत. जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टरांनी सध्या कोरोना महामारीत शासनाच्या रुग्णालयामध्ये आणि सेवेमध्ये काम करुन गोरगरिबांचे आशिर्वाद घेणे आवश्यक होते, मात्र खासगी रुग्णालय उघडून पैसे कमवण्याचा नादात वैद्यकीय व्यवसाय हा सेवा व्यवसाय आहे हेच ते विसरले आहे. मात्र त्यामुळे रुग्णालयात होणारे रुग्णांचे हाल आणि जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेवर येणारा ताण भविष्यात या डॉक्टरांना माफ करेल का? हा खरा प्रश्न आहे.
रेमडेसिवीर सांगू नका?
खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणार्या रुग्णांना डॉक्टर रेमडेसिवीर उपलब्ध करा, कुठूनही आणा, पेशंट सेटल होईल असे सांगून रुग्णालयामध्ये होणारा ताण कमी करत आहेत. वास्तविक पाहता रेमडेसिवीर आणि ऑक्सीजन हे दोन्हीही घटक शरिरात सारखेच काम करतात. केवळ ऑक्सीजनवरही रुग्ण वाचू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा आग्रह धरणे चूकीचे आहे. मात्र रुग्णालयातील अर्थकारणामुळे रेमडेसिवीर सांगीतले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. दुसरी बाजूही त्याची तेवढीच महत्वाची आहे. काही नातेवाईक आपल्या रुग्णाला रेमडेसिवीर देण्याचा आगह धरतात हे चूकीचे आहे. ऑक्सीजनवर देखील रुग्ण बरा होवू शकतो हे अनेक तज्ञांनी सांगीतले आहे.
खासगी रुग्णालयातूनच काळाबाजार
रेमडेसिवीर इंजेक्शनची किमंत वाढवण्यास खर्या अर्थाने खासगी दवाखाने आणि त्यातील डॉक्टरच कारणीभूत आहेत. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याचे सांगीतले तर नातेवाईक बाजारामध्ये प्रयत्न करतात. दोन दिवसापूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने थेट अकोल्याहून तीन इंजेक्शन आणल्याची माहिती आहे तर दुसर्या एका रुग्णासाठी औरंगाबाद येथून 28 हजार रुपयांना रेमडेसिवीर आणल्याची चर्चा होत आहे.
कारवाई तरी काय होणार?
जिल्हा रुग्णालयात अनाधिकृतपणे गैरहजर राहिल्यानंतर आणि प्रशासनावर ताण आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अधिकार्यांनी काही डॉक्टरांना गैरहजर असल्याबद्दल शो-कॉज काढली आहे. सिव्हिल सर्जन करुन-करुन काय कारवाई करेल? असा उलट प्रश्न शो-कॉज मिळालेले डॉक्टर करत आहेत. निलंबित केले तरी पगार चालूच असतो, आणि चौकशी लागली तरी पगार चालूच असतो. त्याहीपेक्षा जिल्हा रुग्णालयात काम करुन पगार घेण्यापेक्षा बाहेर खासगीत पैसा जास्त भेटतो असेही हे डॉक्टर उत्तर देत आहेत.
Leave a comment