रुग्णालय मोठे झाले, रुग्ण वाढले, पण
डॉक्टर आणि कर्मचार्यांची वाणवा
बीड । वार्ताहर
डॉक्टरही नाही, वार्डामध्ये नर्सही नाहीत, वार्डबॉयचे तर सोडून द्या, इकडे मात्र दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. रुग्णांच्या संख्येबरोबरच वार्डही वाढत आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वार्डची परिस्थिती पाहिली तर हे रुग्णालय आहे का? असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. दोन दिवसापूर्वीच वार्डमधील भोंगळ कारभार दर्शविणारा व्हिडिओ व्हायरल झाला मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या महसूल आणि आरोग्य प्रशासनावर आणि पोलीस प्रशासनावर देखील त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. मूळातच ‘यथा राजा तथा प्रजा’ या म्हणीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गित्ते यांचेच रुग्णालय प्रशासनामध्ये लक्ष नसल्याने रुग्णालयाचा कारभार कंत्राटी डॉक्टर, कामगारांवर रामभरोसे झाला आहे. या रामभरोसे कारभारामुळे देखील गेल्या महिनाभरात अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. जो करतो तो मरतो अशा पध्दतीने काही डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी काम करत आहेत. मात्र काम करणार्यांवरच ताण पडत आहे. तुटपूंज्या डॉक्टर आणि कर्मचार्यांवर रुग्णालयाचा कारभार चालतो तरी कसा? असाच प्रश्न आहे.
जिल्हा रुग्णालय म्हटले तर सर्व सोयींयुक्त रुग्णालय असा त्याचा अर्थ होतो. रुग्णालयाच्या खाटा वाढल्या, परिसर वाढला, इमारती वाढल्या, मात्र डॉक्टर आणि कर्मचार्यांची संख्या कमी होत गेली. रुग्णालयामध्ये काही नव्याने मशिनरीही आल्या.परंतु तंत्रज्ञ आले नाहीत. जिल्हा रुग्णालयाचा कारभार कंत्राटी डॉक्टरांवर चलावा हेच मूळात दुर्देव आहे. रुग्णालयामध्ये सध्या 730 खाटा असून 667 रुग्ण उपचार घेत आहेत. या 730 खाटांसाठी 130 वार्डबॉय कार्यरत आहेत. 100 बेडसाठी 12 वार्डबॉय, 10 डॉक्टर अन् जवळपास 30 नर्स असा स्टाफ आवश्यक असतो. या पध्दतीने गणित लावले तर किती डॉक्टरांची आणि नर्सची कमतरता आहे हे लक्षात येईल. जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वार्डमध्ये 36 कंत्राटी डॉक्टर कार्यरत असून यात केवळ 4 फिजिशियन आहेत. केवळ 4 फिजिशियनवरच 650 कोव्हिड रुग्णांचा उपचार अवलंबून आहे. रुग्णालयातील अनेक डॉक्टर सध्या प्रायव्हेट पॅ्रक्टिसमध्ये अडकलेले आहेत. रुग्ण वाढले ही कंत्राटी डॉक्टर अन् कामगार वाढवायचे, अशा पध्दतीने रुग्णालयाचा कारभार सुरु आहे. अलिकडे तर अनेक वार्डामध्ये बेड नाहीत, काही ठिकाणी बेड आहेत तर गाद्या नाहीत, स्वच्छतागृहाची सुविधा नाही. पिण्याचे पाणी नाही. नातेवाईकांना थांबण्यासाठी कक्ष नाही. रुग्णालयामध्ये सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक पूर्ण रुग्णालय फिरले की नाही याबद्दलही सांशकताच आहे. एकीकडे रुग्णालयाची व्याप्ती आणि खाटा वाढल्या, आणि रुग्णही वाढले मात्र डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांची संख्या मात्र वाढवली गेली नाही. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत रुग्णांचे हाल मात्र होत आहेत. आता तरी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का? हा खरा प्रश्न आहे.
हजार वेळेस प्रस्ताव गेले;मान्यता नाही
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, विभागप्रमुख, स्त्रीरोग तज्ञ, फिजिशियन, वेगवेगळे तंत्रज्ञ यांच्या जागा भरण्यासाठी गेल्या दोन वर्षात हजारवेळेस प्रस्ताव गेले, मात्र सरकारने जागा भरल्या नाहीत. जिल्हा रुग्णालयात 24 फिजिशियनची गरज असताना या रुग्णालयाचा कारभार केवळ 4 फिजिशियनवर चालतो. त्यामुळे रुग्णांचे बेहाल होत आहेत. सदरील जागा भराव्यात यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीदेखील जागे होणे गरजेचे आहे, केवळ विकासाच्या गप्पा मारुन उपयोग नाही. मूलभूत गरजांमधील डॉक्टर ही एक गरज आहे, असा विचार करुन विद्यमान लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडून या जागा भरण्यासाठी परवानगी आणणे गरजेचे आहे.
चमकोगिरी थांबवा
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच समाजसेवक म्हणून मिरवणारे अनेकजण येवून विनाकारण चमकोगिरी करतात. ती चमकोगिरी करण्यापेक्षा रुग्णांना काही मदत करता येते का? याचा विचार करणे गरजेचे आहे. रुग्णालयात जायचे, आणि मोबाइलवर फोटो टाकून स्वत: मिरवायचे हे कुठेतरी बंद झाले पाहिजे. अपवाद काही लोक नक्कीच आहे, ज्यांच्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना चमकोगिरी करणार्या लोकांनी काम करु देणे गरजेचे आहे.
धनंजय मुंडेंनी तरी लक्ष द्यावे
पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यावर आणि गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटात धनंजय मुंडेंनी जिल्हा रुग्णालय आणि स्वाराती रुग्णालयाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. हा निधी आला की नाही? हा वेगळा प्रश्न आहे. जाहिर केलेल्या मशिनरी आल्या का नाही, हे ही तपासणे गरजेचे आहे पण त्याही पेक्षा धनंजय मुंडेंनी जिल्हा रुग्णालय आणि स्वाराती तसेच लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयाच्या रिक्त जागा भरण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला आग्रह धरावा तरच अशा संकटात पूर्ण: क्षमतेने रुग्णालयाचा कारभार चालेल. नाही तर पुढचे पाठ, मागे सपाट हे चालूच आहे, पण धनंजय मुंडेंनी हे बंद करुन जागा तातडीने भरण्यासाठी मनावर घेणे गरजेचे आहे.
Leave a comment