नवी दिल्ली :
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जात आहे. त्यानंतर १ मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला.या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जातेय. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली. आता देशातील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा वेगवान करत यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे. यासंदर्भात सातत्याने देशात मागणी केली जात होती. आता हिच मागणी केंद्राने मान्य केली आहे. यामुळे देशातील कोरोना लसीकरणाचा आणखी वेग वाढणार आहे.
देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा
कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Leave a comment