टेकअवे सुरु पण संचारबंदीत बाहेर पडायचं कस?
रोजीच नाही तर रोटी तरी कुठून येणार
सर्वकाही मोकळे मग निर्बंध कुठे?
बीड । वार्ताहर
मंगळवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल 14 एप्रिलपासून राज्यात बे्रक दि चैन या टॅगलाईनखाली कडक निर्बंध असलेले लॉकडाऊन जाहीर केले. मात्र त्यांनी दिलेल्या नियमावलीचे वाचन केल्यानंतर चांगले-चांगले गोंधळात पडले आहेत. एकीकडे संचारबंदी लावायची, आणि दुसरीकडे पार्सल आणण्यासाठी टेकअवे सुरु ठेवायचे, पण घरातून बाहेर पडायचं कसं? पोलीसांचे रट्टे खायचे कोणी आणि पोलीस जर यंत्रणा लावणार नसतील, अडवणार नसतील तर मग लोक घरात कशाला राहणार, हा मूळ प्रश्न असून हातगाडे, किराणा,भाजीपाला, गॅस, पेट्रोल पंप, मेडिकल, दवाखाने, स्वीटमार्ट,दूधविक्रेते आदी दुकानदारांना परवानगी दिली आहे, मग बाजारात गर्दी होणार नाही का? कडक निर्बंध कुठे राहणार? त्यामुळेच लोकांना हा लॉकडाऊन म्हणजे ‘लहरी राजा,प्रजा आंधळी, अंधातरी दरबार, उध्दवा अजब तुझे सरकार’ या सुधीर गाडगीळ यांच्या रचनेची प्रचिती येवू लागली आहे. कशाचा कशाला मेळ नाही, असाच काही निर्बंध ठरू नये अशीही लोकभावना निर्माण झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग गेल्या महिनाभरात प्रंचड वाढला आहे. मुंबई-पुण्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना,बीड हे जिल्हे हॉटस्पॉट ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि राज्यातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात लॉकडाऊन आणि निर्बंध सुरु आहेत. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले होते, आता काल रात्रीपासून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कडक निर्बंध आणि संचारबंदी लावली आहे. त्यांनी फेसबूक लाईव्हवरुन राज्यातील जनतेशी जो संवाद साधला, त्यामध्ये जे काही सांगीतले, ते लोकांना कळालेच नाही. एकीकडे हॉटेल, भेळ,पाणीपूरी,चहाचे गाडे सुरु ठेवायचे, हॉटेलमधून पार्सल व्यवस्थाही सुरु ठेवायची, दारु दुकानेही सुरु ठेवायचे पण आज संचारबंदी असल्याने बाहेर आणायला जायचे कसे? एखाद्या नागरिकाला भाजी आणण्यासाठी जायचे असेल तर संचारबंदीत तो जाणार कसा? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. याबरोबरच सार्वजनिक वाहतूक, एसटी वाहतूक आणि रिक्षांना परवानगी दिली आहे, गॅस एजन्सीधारकांकडे त्यांच्या स्वत:ची वाहने आहेत. पाणी वाटप करणार्या जार वाल्यांकडेही त्यांची वाहने आहेत. आरोग्य कर्मचार्यांना ये-जा करण्यासाठी एसटीची मदत होणार आहे. रिक्षामध्ये प्रवास करण्यासाठी दोघांना परवानगी दिली मात्र तिथेही संचारबंदी आडवी येणार, त्यामुळे रिक्षा आणि बसमध्ये कोण बसणार? हा खरा प्रश्न आहे. सरकारने जी नियमावली दिली ती जुन्या बाटलीत नवी दारु असाच काहीसा प्रकार आहे. केवळ आणि केवळ मदतीची घोषणा सोडली तर बाकी कडक निर्बंध म्हणजेच सर्व काही सुरु असाच अर्थ त्या नियमावलीचा निघत आहे. त्यामुळे खर्या अर्थाने ‘उध्दवा अजब तुझे सरकार’ याची प्रचिती येत आहे.
लॉकडाऊन खिळखिळे करुन टाकले
लागणार..लागणार.. लागणार.. लॉकडाऊन लागणार अशी चर्चा आठवडाभर सुरु होती. अनेक कामगारांनी महानगरे सोडून गाव गाठले; मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांना गावी आल्याचा पश्चाताप झाला.दळणवळणावर काहीसे निर्बंध असले तरी कडक बंद ठेवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे या कामगारांना फार काही जास्त त्रास झाला नसता अशीही भावना निर्माण झाली आहे. केवळ कपडे, भांडे, सोने-चांदी आणि हार्डवेअर ऐवढीच दुकाने बंद आहेत, बाकी सर्व सुरु आहेत, त्यामुळे या लॉकडाऊनला काही अर्थ नाही. तीन पक्षाचे सरकार असल्याने लॉकडाऊन खिळखिळे करुन टाकल्याची चर्चा होवू लागली आहे.
रात्रीतून किराणा दुकानांची संख्या वाढली
किराणा दुकानदारांना या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत घेवून दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिल्याने बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 24 तासात किराणा दुकानांची संख्या दहापटीने वाढली आहे. इतर व्यवसाय करणार्यांनी ऑनलाईन किराणा दुकानांची नोंदणी करुन घेवून परवाने काढले आहेत. ऑनलाईन परवानगी तपासली तर ही संख्या मोठ्या घरात जाईल.
ईदच्या पार्श्वभूमीवर हातगाडे सुरु ठेवले
पवित्र रमजान महिन्यालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळेच या लॉकडाऊनमध्ये फिरत्या हातगाड्यांना सरकारने परवानगी दिली आहे. चहा,भजे,भेळ, पावभाजी आदी खाद्यपदार्थ विकणार्या हातगाड्यांना निर्बंधामधून वगळण्यात आले आहे. गोरगरिब मुस्लिम बांधवांना उपवास सोडण्यासाठी अन्न-पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात असून यामागेही मताचे राजकारण असल्याची टिका होवू लागली आहे.
राज्य सरकारच्या आदेशात गोंधळ
पुण्यात व्यापारी वर्ग कोर्टात जाण्याच्या विचारात
राज्य सरकारने संचारबंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे. या गोष्टीला व्यापारी वर्गाचा पूर्ण विरोध आहे. एकीकडे लोकांनी बाहेर येऊ नये म्हणतात तर दुसरीकडे रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू होणार असल्याचेही जाहीर करतात.
सगळं सुरू आहे मग आदेश कुठला आहे? आदेशच गोंधळाचा आहे, आम्ही कोर्टात जाण्याचा विचार करत आहोत या शब्दात पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी राज्य सरकारवरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांवरून व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. आंदोलनातून हा विरोध नोंदवल्यानंतर प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत व्यापारी वर्गाने एक पाऊल मागे घेत दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला होता. याचवेळी राज्य सरकारच्या पूर्ण लॉकडाऊनला आमचा पाठिंबा असेल मात्र तो जाहीर केला नाहीतर तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने फत्तेचंद रांका यांनी घेतली होती.
याबाबत रांका म्हणाले, राज्य सरकार एकीकडे रस्त्यावरच्या स्टॉलला परवानगी देते आहे. शहर रिक्षा, खासगी वाहतुकीला परवानगी देत आहे. त्याद्वारे कोरोनाचे संक्रमण होत नाही का? संचार बंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे. याला आमचा पूर्ण विरोध आहे. सगळं सुरू आहे मग आदेश कुठला आहे? आदेशच गोंधळाचा आहे, आम्ही कोर्टात जाण्याचा विचार करत आहोत असेही रांका यांनी यावेळी सांगितले.वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांनी पुण्यातील भीषण परिस्थिती अकडेवारीसह समजावून सांगितली. तसेच आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे दुकाने न उघडण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घ्यावी अशी विनंती केली. त्याचा मान ठेवत पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर आपले आंदोलन स्थगित करत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.
Leave a comment