नवी दिल्ली:
भारतात एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढला आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचीमागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या इंजेक्शनची मागणी वाढण्याचं कारण म्हणजे हा कोरोनावर उपचार समजला जात आहे. मात्र, जागितिक आरोग्य संघटनेनं ही गोष्ट मान्य केलेली नाही. WHOनं याआधीही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात असल्यानं प्रश्न उपस्थित केले होते. आता पुन्हा एकदा WHOनं म्हटलं आहे, की असा कोणताही पुरावा नाही, की हे इंजेक्शन कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपयोगी आहे.
गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) स्पष्टीकरणामुळे चिंतेत भर पडली आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारात रेमडेसिविर प्रभावी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. देशात रेमडेसिविरची मागणी वाढत असताना, त्यासाठी काळाबाजार होत असताना डब्ल्यूएचओकडून आलेलं स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर डब्ल्यूएचओनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कोरोनाच्या उपचारांत रेमडेसिविर उपयोगी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हेच समोर आलंय की करोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
रेमडेसिवीरच्या उपयुक्तेबाबत पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्याच्या पुराव्याचा संदर्भ देत डॉ. स्वामिनाथन म्हणाले, “पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यातून हाती आलेल्या पुराव्या आधारे असं दिसून आलं की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरात घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधी घट झाली. तसंच आजारांवरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचं दिसून आलं नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.
“आम्ही सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र, सध्या रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्याच्यावर आमचं लक्ष्य आहे,” डॉ. मारिया म्हणाल्या. सुधारित डेटावर आमचं लक्ष असून, त्याचा वापर रेमडेसिवीरबद्दलची मार्गदर्शक तत्वे अपडेट करण्यासाठी केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.
Leave a comment