बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शनिवारी (दि.10) जिल्ह्यात तब्बल 764 नवे रुग्ण निष्पन्न झाले. बाधितांचा 24 तासातील आकडा विक्रमी संख्येने वाढल्याने कोरोनाची स्थिती विदारक चालल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी जिल्ह्यातील 6 हजार 140 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल आज शनिवारी प्राप्त झाले. यात 5 हजार 376 रिपोर्ट निगेटिव्ह आले.बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 143, आष्टी 123, बीड 141, धारुर 29, गेवराई 60, केज 71, माजलगाव 73, परळी 59, पाटोदा 25, शिरुर 26 आणि वडवणी तालुक्यातील 14 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, काल शुक्रवारी पाच जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात माजलगाव शहरातील समर्थनगर भागातील 58 वर्षीय पुरुष, केज शहरातील 65 वर्षीय महिला, मुडेगाव (ता.अंबाजोगाई) येथील 70 वर्षीय महिला, नांदुरघाट (ता.केज) येथील 65 वर्षीय पुरुष, देवीनिमगाव (ता.आष्टी) येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 31 हजार 278 झाली असून 26 हजार 724 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 690 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जि.प.चे सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.
Leave a comment