आ.संदीप क्षीरसागरांवर नामुष्कीची वेळ
बीड । वार्ताहर
अवैध बांधकाम आणि बेटरमेंट चार्जेस प्रकरणात चौकशीचे आदेश देऊन नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांना अपात्र करा अशी याचिका आ.संदीप क्षीरसागर यांनी मंत्रालयात दाखल केली होती. सदर याचिकेविरूद्ध नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने नगराध्यक्षांविरूद्ध मंत्रालयात दाखल अपात्रतेच्या याचिकेला स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मंत्र्यांनी नगराध्यक्षांविरूद्ध कोणतेही प्रोसेडींग करू नये असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले असून आघाडीत फूट पडल्याने खोटेनाटे आरोप करून खोट्या तक्रारी करून कार्यकर्ते हातातून निसटू नयेत म्हणून केलेले प्रयत्न फसू लागले आहेत. ज्या जागेबाबत आमदाराने आरोप केले ती जागा माजी मंत्री क्षीरसागर यांच्या नावावर आहे. यापूर्वीही हाय कोर्टात नगराध्यक्षांच्या विरोधात अपात्रतेच्या दावा दाखल केला होता, त्याच वेळी आ.संदीप क्षीरसागर यांचा त्या जागेबाबत आक्षेप असण्याचे कारण काय? यामध्ये त्यांचे कोणते नुकसान आहे अशी विचारणा न्यायालयाने केली होती व त्यात एक लाख रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते मात्र आमदारांनी हे पैसे भरले नाही म्हणून तो दावा देखील रद्द करण्यात आला आहे. नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यासाठी आमदाराने बीड न्यायालय, उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद आणि मंत्रालयातही मोठा आटापिटा करून बरेच प्रयत्न केले मात्र सगळीकडेच आमदाराची नामुष्की झाली आहे..
बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नगरपरिषद व औद्योगिक नगरी 1965 च्या कलम 55 अ व ब नुसार तसेच महाराष्ट्र नगर रचना प्रादेशीक अधिनियम 1966 चे कलम 47 व 124 (ड) आर्थिक अनियमीतता करून पालिकेचे, शासनाचे नुकसान केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे दाखल केली होती. अनियमीतता प्रकरणी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्याविरूद्ध अपात्रतेची कार्यवाही करावी असेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात शासनाने दि.31 मार्च 2021 पर्यंत अहवाल द्यावा असे निर्देश बीड जिल्हाधिकार्यांना दिले होते. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्र्यांकडे दाखल केलेल्या नगराध्यक्षांवरील अपात्रतेच्या याचिकेला नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सदर प्रकरणात उच्च न्यायालयाने आज नगराध्यक्षांविरूद्ध मंत्रालयात दाखल अपात्रतेच्या याचिकेला स्थगिती दिली आहे. मंत्र्यांनी या प्रकरणामध्ये नगराध्यक्षांविरूद्ध कोणतेही प्रोसेडींग करू नये असे निरीक्षण नोंदविल्याचेही समजते. या प्रकरणात नगराध्यक्षांच्या बाजुने अॅड.सतिष तळेकर यांनी काम पाहिले तर त्यांना बीड येथील अॅड.सय्यद शाहेद यांनी सहकार्य केले. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्षांविरूद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेला स्थगिती मिळाल्याने हा निर्णय त्यांच्यासाठी सणसणीत चपराक ठरली आहे.
सत्याचा विजय झाला; आता तरी इतरांच्या कामावर
जावुन फोटो काढण्याचे धंदे बंद करा-डॉ.क्षीरसागर
आमदारांनी सत्तेचा दुरूपयोग करून काहीही केले तरी अखेर सत्याचा विजय होतो अशी प्रतिक्रिया नगरसेवक तथा शिवसेनेचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे. आमच्या आणि इतरांच्या कामावर जाऊन फोटो काढण्याचे धंदे बंद करा. स्वत: काही विकास कामे आणुन दाखवा, केवळ हेलिकॉप्टरमध्ये बसुन फोटो काढून विकास होत नसतो. यातुन मतदारसंघाचा नव्हे तर केवळ फोटोचा विकास होतो याचे भान ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी एखादे काम आणुन दाखवावे असेही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
Leave a comment