कोरोनाचे नवे 580 रुग्ण वाढले;292 कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
जिल्ह्याची कोरोना स्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी (दि.7) सलग दुसर्या दिवशी पुन्हा 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्याची स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. यापूर्वी सलग दोन दिवसात 20 जणांचा मृत्यू झालेला नव्हता. तसेच 580 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 292 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मागील पाच दिवसापासून अंबाजोगाई , बीड व आष्टी तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील 3 हजार 529 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल आज बुधवारी प्राप्त झाले. यात 2 हजार 949 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 580 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 114, 71, बीड 146, धारुर 15, गेवराई 36, केज 50, माजलगाव 39, परळी 60, पाटोदा 18, शिरुर 21 आणि वडवणी तालुक्यातील 10 जणांचा समावेश आहे. बुधवारी 10 कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यामध्ये नाथनगर,परळी येथील 62 वर्षीय पुरुष, भटगल्ली,अंबाजोगाई येथील 75 वर्षीय पुरुष, बोरखेड (ता.परळी) येथील 67 वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील 48 वर्षीय महिला, तांबाराजुरी (ता.पाटोदा) येथील 67 वर्षीय पुरुष, गेवराई शहरातील 68 वर्षीय पुरुष, वाघाळा (ता.अंबाजोगाई) येथील 72 वर्षीय पुरुष, गित्ता (ता.अंबाजोगाई) येथील 53 वर्षीय पुरुष, माजलगाव शहरातील 65 वर्षीय पुरुष व केज शहरातील 90 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 29 हजार 71 इतका झाला असून यापैकी 25 हजार 738 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकूण मृत्यूची संख्या 682 झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार साथरोग अधिकारी पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
धास्ती नको, काळजी घ्या
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी दररोज कोरोनामुक्त होणार्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोना झाला तरी घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सुचनेनुसार उपचार करुन घ्यावेत. कोरोनावर यशस्वीपणे मात करता येते त्यामुळे लक्षणे जाणवताच नागरिकांनी कोरोना चाचणी करुन घेवून आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. कोरोनाची धास्ती न घेता प्रत्येकाने सर्तकता बाळगून नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
Leave a comment