अध्यक्षपदी अविनाश पाठक; राष्ट्रवादीचा विजयोत्सव औटघटकेचा!
बीड । वार्ताहर
सेवा सहकारी संस्था मतदार संघातील सर्वच अर्ज बाद ठरल्याने जिल्हा बँकेच्या 19 पैकी 11 संचालकांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक होवूनही गणपूर्ती अभावी नविन संचालक मंडळ स्थापित होऊ न शकलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि.7) लातूरचे विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी पाच सदस्यीय प्रशासक मंडळाची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली. जिल्हा बँकेचे प्रशासक म्हणून औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त अविनाश पाठक हे काम पाहणार आहेत. प्रशासक मंडळाच्या नेमणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयोत्सव औटघटकेचा ठरला आहे.
अविनाश पाठक यांच्या सोबत सदस्य म्हणून शिखर बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे ,सहाय्यक निबंधक अशोक कदम आणि अॅड. अशोक कवाडे यांची नेमणूक झाली आहे. सहा महिन्यांसाठी ही नेमणूक असून धनराज राजाभाऊ मुंडे व इतर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेच्या अधिन राहून ही नियुक्ती असल्याचे आदेशात नमूद आहे. दरम्यान, प्रशासकीय मंडळाने बुधवारी सायंकाळी सात वाजता जिल्हा बँकेत पदभार स्वीकारला. यावेळी अधिकारी-कर्मचार्यांनी त्यांचा सत्कार केला.
डीसीसी बँकेच्या 19 जागांसाठी 20 मार्च रोजी मतदान होऊन 21 रोजी निकाल जाहीर झाला, पण सेवा संस्था मतदारसंघात वार्षिक तपासणी अहवालातील अ किंवा ब वर्गवारीच्या अटीमुळे एकही उमेदवार पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे केवळ आठ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.आठपैकी चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, एका जागेवर काँगे्रसने विजय मिळवला तर अपक्ष राजकिशोर मोदी यांनीही मुसंडी मारली. भाजप व शिवसेनेने प्रत्येकी एक जागा पटकावली. दरम्यान, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 अअअ (5) (अ) मधील तरतुदीनुसार बँकेच्या पोटनियमानुसार एकूण संचालक मंडळाच्या संख्येच्या दोन - तृतियांश किंवा त्याहून अधिक संचालक निवडून आलेले नसल्यामुळे समितीची रचना झालेली नाही. त्यामुळे बुधवारी (दि.7) विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी पाच सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली.
बँकेचा कारभार पारदर्शक ठेवणार-अविनाश पाठक
बँकेचे प्रशासक मंडळांची नियुक्ती झाल्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार पारदर्शक करण्यावर भर राहील. जास्तीत पीककर्ज वाटपाला पहिले प्राधान्य राहील. बँक कामकाजात शिस्त यावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
असे आहे नवनिर्वाचित संचालक
कल्याण आखाडे (राष्ट्रवादी काँग्रेस, इतर मागासवर्गीय), सुशीला पवार (भाजप, महिला प्रतिनिधी), कल्पना शेळके (शिवसेना, महिला प्रतिनिधी),भाऊसाहेब नाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस, कृषी पणन व प्रक्रिया संस्था), सूर्यभान मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस, भटक्या विमुक्त जाती/जमाती), रवींद्र दळवी (काँग्रेस, अनुसूचित जाती/जमाती), अमोल आंधळे (राष्ट्रवादी काँगस, इतर शेती संस्था), राजकिशोर मोदी (अपक्ष, नागरी बँका/पतसंस्था)
Leave a comment