केज । वार्ताहर
ऊस वाहतुक ठेकेदारीसाठी मुदतकर्ज घेण्यासाठी कर्जास तारण म्हणून ठेवलेली जमिन विक्री करण्यासाठी बोजा विरहित खोटा सातबारा तयार करुन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार युुसुफवडगाव येथे समोर आला. या प्रकरणात माजी जि.प.सदस्यासह त्याची पत्नी व अन्य एकाविरुध्द केज ठाण्यास फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.
माजी जिल्हा परिषद सदस्य महारुद्र सखाहारी लामतुरे व पत्नी सौ.सुशीला महारूद्र लामतुरे व शांतलिंग विश्वनाथ लामतुरे (सर्व रा.युसूफवडगाव.ता.केज) यांचा आरोपीत समावेश आहे. 18 नोव्हेंबर 2015 ते 02 डिसेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.
युसुफवडगांव येथील सुशीला महारूद्र लामतुरे यांनी प्रियदर्शनी अर्बन को-ऑप-बँक लि.कळंब मुख्य शाखा कळंब या बँकेकडून ऊस वाहतुक ठेकेदारीसाठी मुदतकर्ज म्हणुन दहा लाख रूपये घेतले होते. या कर्जास तारण देवून आरोपीचे नावारील असलेली शेत सर्वे नं 131 मधील जमीन तारण दिली. गहाणखताव्दारे सातबारा पत्रकावर बँकेचे कर्ज घेतले. या बाबत बोजा नोंद असताना स्वत:च्या आर्थीक फायद्यासाठी बँकेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर बोजा विरहीत खोटा सातबारा तयार करून घेतला. नंतर खरेदी खत करून बँकेकडे गहाण ठेवलेल्या सर्वे नं 160 मधील 3 हे.55 आर जमिन शांतलिंग विश्वनाथ लामतुरे यांना जमीन विक्री केली. तसेच आरोपी शांतलिंग विश्वनाथ लामतुरे याना सदर जमिनीचा खोटा सातबारा तयार केलेला माहीत असतांना व त्यावर कर्ज आहे हे माहित असतांना जमिन खरेदी केली. आरोपी महारुद्र सखाहारी लामतुरे साक्षीदार म्हणुन सह्या करून संगणमताने फसवणुक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे वसुली अधिकारी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.सहायक निरीक्षक संतोष मिसळे पुढील तपास करत आहेत.
Leave a comment