बीड | वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 200 च्या पुढे सरकली आहे. आज सोमवारी (दि.22) जिल्ह्यात कोरोनाचे 239 नवे रुग्ण निष्पन्न झाले.
रविवारी जिल्ह्यातील 2179 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आज सोमवारी प्राप्त झाले. यात 1940 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 239 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये सर्वाधिक 106 रुग्ण बीड तालुक्यात निष्पन्न झाले. याशिवाय अंबाजोगाई 43, आष्टी 15, धारुर 12, गेवराई 10, केज 20, माजलगाव 11, परळी 15, पाटोदा 2, शिरुर 3 आणि वडवणी तालुक्यात 2 रुग्ण निष्पन्न झाले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
परळीचे वैद्यनाथ मंदिर आता 4 एप्रिलपर्यंत राहणार बंद
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने परळी येथील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री.वैद्यनाथ मंदिर येत्या 4 एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी पुर्णत: बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत.
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन यापूर्वी 11 मार्च 2021 पासून सुरु होणारे परळी येथील वैद्यनाथ मंदिरातील महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दर्शनाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी होवू नये यासाठी 8 ते 16 मार्च या दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते नंतर कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने या आदेशाला आज 22 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने श्री.वैद्यनाथ मंदिर येत्या 4 एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी पुर्णत: बंद ठेवण्यात आले आहे.
Leave a comment