सत्ता कोणाचीही आली तरी औटघटकेची ठरणार
बीड । वार्ताहर
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 8 जागेसाठी उद्या दि.20 मार्चला मतदान होत असून या मतदान प्रक्रियेनंतर कोणत्याही गटाचे संचालक निवडून आले तरी हे संचालक औट घटकेचेच ठरणार आहेत. कारण कोरम पूर्ण होत नसल्याने ही निवडणूक पुन्हा रद्द होईल. सहकार कायद्यातील कलम 77 अ नुसार सदरील संचालक मंडळ बरखास्त होवून प्रशासक मंडळ किंवा प्रशासकाची नियुक्ती करण्याची व्यवस्था या कायद्यातंर्गत करण्यात आली आहे. जिल्हा बँकेवर सेवा सहकारी सोसायटी मतदार संघाचा तिढा सुटेपर्यंत प्रशासकच राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांची बँक समजल्या जाणार्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सेवा सहकारी संस्थांना लेखा वर्ग अ आणि ब नसल्यामुळे त्या मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख यांनी या मतदार संघातील 11 संचालक पदासाठीचे सर्वच 87 अर्ज बाद ठरवलेले आहेत. त्यानंतर आता हे प्रकरण हायकोर्टात गेले. हायकोर्टात फेटाळल्यानंतर काही उमेदवार सर्वोच्च न्यायालयातही गेले. तेथेही काल त्यांचे अपिल फेटाळण्यात आले. त्यामुळे केवळ आठ जागेसाठीच मतदान होणार आहे. यासाठी 41 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून यातील कोणत्याही गटाचे उमेदवार निवडून आले किंवा कोणीही निवडून आले तरी ती निवड औटघटकेचीच ठरणार आहे. कारण कमीत कमी 11 संचालक तरी निवडून येणे आवश्यक आहे. तरच संचालक मंडळाची समिती स्थापन होवू शकते. केवळ आठच उमेदवार निवडून येणार असल्याने समिती गठीत होवू शकत नाही.त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ औपचारिता ठरणार असून येत्या काही दिवसात जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे.
Leave a comment