अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानेही सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद
दुकानदारांसह कामगारांना दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी बंधनकारक
बीड | वार्ताहर
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासन अॅक्शनमोडवर आले आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पानटपरी हे सर्व ग्राहकांसाठी अनिश्चित काळासाठी पुर्णत:बंद करण्याचे आदेश आज शनिवारी (दि.13) जारी केले आहेत. याठिकाणी केवळ पार्सल सुविधा सुरु ठेवल्या जाणार आहेत. तसेच येत्या 18 मार्चपासून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय तसेच फंक्शन हॉल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना (अत्यावश्यक, किराणा, दुध विक्रेते व मेडिकल वगळून) सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत बंद राहतील असेही आदेश जारी करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना वेगाने वाढू लागला आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग अधिनियम दि.13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. कोरोनामुळे उद्भवणार्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंद व नियंत्रण यासाठी शासनाने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे सक्षम अधिकारी म्हणून घोषणा केलेली आहे. जिल्ह्यात येत्या 31 मार्चपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार आज शनिवारी जिल्हाधिकारी यांनी नव्याने आदेश जारी केले असून या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पानटपरी हे सर्व ग्राहकांसाठी पुर्णत:बंद करण्याचे आदेश आज शनिवारी (दि.13) जारी केले आहेत. याठिकाणी केवळ पार्सल सुविधा सुरु ठेवल्या जाणार आहेत. याठिकाणी सर्वांनी कोरोना बाबतच्या मार्गदर्शन तत्वांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सामाजिक अंतर इत्यादींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आले आहे. महसुल, पोलीस, संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषध प्रशासन इत्यादी विभागाने वरील आदेशाचे पालन होण्यासाठी वेळोवेळी तपासणी करावी तसेच संबंधित आस्थापनांचे चालक हे कोव्हीड-19 बाबतच्या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर फौजदारी व योग्य ती दंडात्मक कारवाई करावी असेही आदेशात जिल्हाधिकार्यांनी नमुद केले आहे.
तसेच येत्या 18 मार्च नंतर पासून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय तसेच फंक्शन हॉल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते यांनी मास्कचा वापर करुन फळ व भाजीपाला विक्री करावा, विनामास्क विक्रेता आढळुन आल्यास त्याच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सर्व दुकानदार, आस्थापनाधारकांनी व त्यांच्या कामगार, कर्मचार्यांनी दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दुकानात गर्दी होणार नाही यासाठी आवश्यकते नियोजन करावे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना (अत्यावश्यक, किराणा, दुध विक्रेते व मेडिकल वगळून) सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत बंद राहतील असेही आदेश जारी करण्यात आले आहे. सदरील आदेशाचा भंग करणार्या व्यक्ती अथवा संस्थानवर पोलीस, महसुल, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून फौजदारी व दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकार्यांनी या आदेशातून दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट
आज पुन्हा 181 पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज शनिवारी (दि.13) जिल्ह्यात तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. या सर्व रुग्णांवर कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील 1691 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 1510 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 181 बाधित रुग्ण निष्पन्न झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 82, अंबाजोगाई 33, आष्टी 18, गेवराई, केज तालुक्यात प्रत्येकी 12, परळी 7, माजलगाव, शिरुर व वडवणी तालुक्यात प्रत्येकी 5 व पाटोदा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment