आठ जागेसाठी 41 जण रिंगणात
बीड । वार्ताहर
निवडणूकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यभरात चर्चेला आलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.10) बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सुभाषचंद्र सारडा यांच्यासह 16 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता आठ जागेसाठी तब्बल 41 उमेदवार निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. दरम्यान विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनीच माघार घेतल्याने चर्चेला उधाण आले. कारण जिल्हा बँकेचे यापूर्वीचे राजकारण हे सुभाषचंद्र सारडा, अमरसिंह पंडीत आणि राजाभाऊ मुंडे यांच्याभोवतीच फिरत आलेले आहे.
बीड डिसीसी बँकेच्या संचालकपदांसाठी येत्या 20 मार्च रोजी निवडणूक होत आहे. सेवा संस्था मतदारसंघातील 11 जागांसाठी 87 जणांनी उमेदवारी दाखल केली होती; मात्र लेखापरीक्षणाच्या अटीमुळे एकही उमेदवार पात्र ठरू शकला नाही. अपात्र उमेदवारांनी लातूरच्या विभागीय सहनिबंधकांसह सहकार मंत्र्यांकडे धाव घेतली पण दोन्ही ठिकाणी त्यांची निराशा झाली. त्यामुळे 11 जागा रिक्तच राहणार आहेत. आता उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडून येणार्या आठ संचालकांना गणपूर्तीअभावी कारभार पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी असली तरी निवडणुकीत मात्र चुरस निर्माण झाली आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 16 जणांनी माघार घेतली. यामध्ये नागरी बँका,पतंसस्था मतदार संघातून आदित्य सारडा, दिपक घुमरे, संजय आंधळे, महारुद्र शेळके, इतर शेती संस्था मतदार संघातून राधाकिशन शेंबडे, आशाबाई काळकुटे, दत्तात्रय देशमुख, विजाभज-विमाप्र मतदार संघातून विजयसिंह बांगर, नवनाथ प्रभाळे, मधुकर ढाकणे, संजय आंधळे, अमोल आंधळे तर कृषी पणन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून केरबा गुंड, बजरंग सोनवणे, आसाराम मराठे व रामदास खाडे या 16 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या 8 मतदारसंघांत मिळून 41 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. येत्या 12 मार्च रोजी चिन्हांचे वाटप होणार असून 20 मार्च रोजी मतदान व 21 मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपालकृष्ण परदेशी यांनी ही माहिती दिली.
Leave a comment