दुपारी बारा वाजेपर्यंत 137 पैकी केवळ 2 बाधित
बीड | वार्ताहर
कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बुधवारपासून बीड शहरातील व्यापार्यांची अॅन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली. शहरातील चार बुथवर ही टेस्ट करण्यात येत असून येत्या 15 मार्च पर्यंत शहरातील सर्व व्यापार्यांची अॅन्टीजेन टेस्ट पुर्ण केली जाणार आहे. टेस्ट न केलेल्या व्यापार्यांना दुकाने उघडता येणार नाहीत असा दंडक असल्याने व्यापार्यांनी कोरोना अॅन्टीजेन टेस्टसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसुन आले. बीड शहरात दुपारी 12 वाजेपर्यंत 137 व्यापार्यांची कोरोना चाचणी झाली. यात केवळ 2 व्यापार्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी ही माहिती दिली.
गतवर्षी 2020 मध्ये शहरातील व्यापार्यांची कोरोना टेस्ट आरोग्य विभागाने हाती घेतली होती. तेंव्हा शहरातील सुमारे साडेआठ हजार व्यापार्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात केवळ 400 व्यापार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह निष्पन्न झाले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापार्यांची अॅन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. सुपर स्प्रेडर शोधण्यासाठी येत्या 15 मार्चपर्यंत अॅन्टीजेन टेस्ट मोहीम राबवली जात आहे. यासाठी शहरातील राजस्थानी विद्यालय, विप्रनगर, चंपावती प्राथमिक विद्यालय, नगर रोड, जि.प.प्राथमिक शाळा, जि.प.प्राथमिक शाळा अशोक नगर आणि कोव्हीड केअर सेंटर आयटीआय या चार ठिकाणी बुधवारपासून अॅन्टीजेन टेस्ट सुरु झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 137 व्यापार्यांनी चार ठिकाणी तपासणी केली. त्यातील केवळ 2 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. उर्वरित 135 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान येत्या 15 मार्चपर्यंत शहरातील 10 हजार व्यापार्यांची कोरोना चाचणी करण्याची उद्दिष्ट आरोग्य विभागाने स्विकारली आहे. बाधित निष्पन्न होणार्या व्यापार्यांवर शहरातील आयटीआय कोव्हीड सेंटरमध्ये उपचार सुरु केले जात आहे. तसेच निगेटिव्ह अहवाल येणार्या व्यापार्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्या आधार आपले दुकान सुरु ठेवता येणार आहे. व्यापार्यांनी दुर्लक्ष न करता अॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी केली आहे.
मोहीम यशस्वी करण्यासाठी यंत्रणेला सुचना
व्यापार्यांची अॅन्टीजेन टेस्ट मोहीम यशस्वी करण्यासाठी सीईओ अजित कुंभार यांनी आरोग्य यंत्रणेला सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तपासणी मोहीमेसाठी नायब तहसीलदार बुथवर शांतता रहावी यासाठी लक्ष ठेवून असतील. जिल्हा शल्यचिकित्सांकडून नोडल ऑफीसरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्वॅब कलेक्शन ठिकाणी प्रत्येकी दोन पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्यापार्यांचे प्रशासनाला सहकार्य-सोहनी, पिंगळे
कोरोनाचे सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी बीड शहरातील सर्व व्यापार्यांनी अॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी व्यापार्यांसोबत गत आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा व्यापारी महासंघ, शहर व्यापारी महासंघ तसेच अन्य व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी, सदस्यांनी पाठींबा देत अॅन्टीजेन टेस्ट करुन घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी 15 मार्च पर्यंत शहरातील जवळपास 10 हजार व्यापारी अॅन्टीजेन टेस्ट करुन घेतील. सर्व व्यापार्यांनी अॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहर व्यापारी महासंघाचे विनोद पिंगळे आदींनी केले आहे.
Leave a comment