साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपीत राजकीय, प्रतिष्ठितांचा समावेश
आष्टी । वार्ताहर
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकार्यांनी सोमवारी (दि.8) आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील जुगारअड्डा उध्दवस्थ केला. छाप्यात 21 जणांना रंगेहाथ पकडून सुमारे साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील बाळेवाडीत राजरोस जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर.राजा यांना मिळाली होती. त्यावरुन पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सोमवारी दुपारी पावणेचार वाजता तेथे धाड टाकली. यावेळी 21 जण तिर्रट खेळताना आढळले. शिवाजी गर्जे, संजय वालेकर, यशवंत खंडागळे, हनुमंत बुध्दीवंत, नवनाथ रोडे, ज्ञानदेव गांगर्डे, बाळासाहेब राळेभात, राजेंद्र शेळके, बंडू वायबसे, दिनकर नागरगोजे, गणेश दिघे, चंद्रभान लोखंडे, लहू माने, सुधाकर तारु, विकास मस्के, सोनू औटे, विकास मस्के, सोनू औटे, सुभाष फूलमाळी,राजू उमरे, केशव उदावंत, बाळासाहेब बंडाले, शिवाजी काळे अशी आरोपींची नावे असून यात काही प्रतिष्ठितांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख एक लाख 14 हजार 640 रुपये, 78 हजार 900 रुपयांचे 16 मोबाइल, 9 लाख 60 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी व दोन कार असा एकूण 11 लाख 53 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्वांना अंभोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अंमलदार संभाजी भिल्लारे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment