कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
बीड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता व्यापार्यांनाही कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. 15 मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी चाचणी करणे अनिवार्य आहे. कोरोना चाचणीशिवाय दुकान उघडल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सोमवारी (दि.8) याबाबत आदेश जारी केले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान संसर्ग वाढत असतानाही नागरिक गाफिलच राहात आहेत. प्रशासनाकडून वारंवार उपाययोजना करून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा व्यापार्यांची सरसकट कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. 15 मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे.त्याशिवाय दुकाने उघडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. यासाठी तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचनाही केल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, गतवर्षी राबविलेल्या विशेष मोहिमेत व्यापारी, दुकानदारांनी प्रशासनाला पुर्ण सहकार्य केले होते.जे बाधित आहेत ते लवकर निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता यावेळी व्यापारी किती प्रतिसाद देतात, हे वेळच ठरविणार आहे.
फराळ विक्रेत्यांना 10 फुटांवर विक्रीस परवानगी
महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यात मोठी बाजारपेठ अथवा इतर ठिकाणी एका जागेवर केवळ 10 फराळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक फराळ विक्रेत्यामध्ये 10 फुटांचे अंतर असणे बंधनकारक आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांना ही परवानगी दिली जाणार असून जे कोरोना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिला आहे.
Leave a comment