बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी शनिवारी (दि.6) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्याकडून जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड रुग्णालयातील तयारीचा आढावाही घेतला. शिवाय रुग्णालय परिसरातील ऑक्सीजन प्लँन्टलाही भेट देत पाहणी करुन या प्लॅन्टमधून थेट कोव्हीड वार्डापर्यंत होणारा ऑक्सीजन पुरवठा याबाबतची माहिती घेतली.
शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ही लस सुरक्षित असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेवून स्वत:ला सुरक्षित ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, मेट्रन संगीता दिंडकर यांच्यासह रुग्णालय प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारीच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, यात्रा तसेच गर्दी होणार्या कार्यक्रमांना 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात अंतर्गत कोरोना उपचार केंद्र साठी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची तसेच येथील लसीकरण केंद्र, नोंदणी कक्ष आदींची पाहाणी केली.
जनतेने नियमांचे पालन करावे
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. कोरोना अद्याप गेलेला नाही, कोविड विरुद्धची अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत, अर्धी राहिली आहे, ती जिंकण्यासाठी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सर्व जिल्हावासियांना केले.
Leave a comment