शोलेमधला गब्बर सापडला पण इथला गबरू सापडत नाही
बीड । वार्ताहर
विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे आ.सुरेश धसांनी सभागृहामध्ये आज ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोरोना संकटात ऊसतोडणीचे काम करणार्या कामगारांची तपासणी करण्यासाठी कारखाना परिसरात हॉस्पीटल उभारण्याची घोषणा केली, ऊसतोड कामगारांचा विमा उतरण्याची घोषणा केली गेली मात्र यातील काहीही केले गेले नाही. ऊसतोड कामगारांवर अन्यायच केला गेला. एकाही कारखान्याने ऊसतोड कामगारांचा विमा काढलेेला नाही किंवा एकाही कारखाना परिसरात कोव्हीड तपासणी केंद्र उभारले गेले नाही त्यामुळे हे सरकार ऊसतोड कामगारांवर अन्याय करणारे आहे असा घणाघाती आरोप करत आ.सुरेश धसांनी सभागृह दणाणून सोडले.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सरकारचे लक्ष वेधतांना आ.धस यांनी आपल्या खड्या आवाजात ऊसतोड कामगारांवर झालेला अन्याय मांडला. लवादाच्या निर्णयानुसार राज्यातला ऊसतोड कामगारांचा संप मिटला आणि माझ्या जिल्ह्यातील लाखो ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात आणि कर्नाटकमध्ये ऊसतोडणीसाठी गेला. सरकारने त्यावेळी ऊसतोडणी कामगारांची कोव्हीड चाचणी करणे, त्यांचा विमा उतरविणे याची जबाबदारी साखर कारखान्यावर टाकण्यात आली होती. मात्र राज्यातील एकाही साखर कारखान्याने एक रुपयाचा देखील विमा उतरविला नाही. अशा कारखान्यावर सरकार काय कारवाई करणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर वसंतदादा शुगर इन्स्ट्यिुटमध्ये ज्या घोषणा केल्या त्या तरी पुर्ण करा अशी मागणीही त्यांनी केली.
गब्बर सापडला पण गबरु सापडेना
आपण शोले पिक्चर पाहिला होता त्यामध्ये गब्बर नावाचा एक डाकू सापडला पण या राज्यात कोण गबरु आहे तो मात्र सरकारला सापडेना त्याचा शोध घेवून त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित करुन अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांच्या प्रकरणात सरकारचा हलगर्जीपणा निदर्शनास आणला.
होमिओपॅथीक डॉक्टरांवर अन्याय
विधान परिषदेमध्ये राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांवर सातत्यपूर्ण होणार्या अन्याया विरोधात सडेतोडपणे आ.. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला. विधिमंडळाने 2014 व 2016 कायदा पारित करून होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देत नाही हा विधिमंडळाचा अपमान आहे हे ठामपणे त्यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले
एमएमसी आणि आय एम एम द्वारे राज्यातील सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण होऊन सुद्धा होमिओपॅथी डॉक्टरांना जाणिवपुर्वक नोंदणी नाकारत आहेत.
Leave a comment